मुंबईः ‘हे सरकार त्यांच्या कृतीमुळेच कोसळेल. आम्हाला सरकार स्थापनेची घाई नाही,’ संजय राऊतांच्या भेटीनंतर विरोधी पक्ष नेते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर, संजय राऊतांसोबत झालेल्या भेटीत शिवसेनेसोबत सत्तास्थापनेवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शनिवारी मुंबईतील ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये राऊत आणि फडणवीस यांच्यात तब्बल अडीच ते तीन तास चर्चा झाली आहे. त्यानंतर शिवसेना – भाजपमध्ये पुन्हा युती होणार का, अशा चर्चा रंगत होत्या. मात्र, आज देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चा फेटाळून लावत. ही भेट अराजकीय असून सामनाच्या मुलाखतीसाठी बैठक झाली असल्याचं सांगत शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचा कोणताही विचार नाही, असंही स्पष्ट केलं आहे.

‘संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी मुलाखत घेणार असल्याचं सांगितलं. त्यासंदर्भात त्यांचा मला फोन आला. पण या मुलाखतीबद्दल माझ्या काही अटी होत्या. मुलाखत अनकटच असेल आणि माझाही कॅमेरा तिथं असेल, असं मी त्यांना सांगितलं. त्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो. यापलीकडे कोणतंही कारणं नाही,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘या बैठकीदरम्यान शिवसेनेसोबत सरकार स्थापनेबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. या सरकारबद्दल नागरिकांच्या मनात आक्रोश आहे आणि विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवर धरणं आमचं काम आहे व ते सुरूच राहिलं. हे सरकार स्वतःच्या कृतीमुळं कोसळेल आम्ही ते पाडणार नाही. आम्हाला सत्ता-स्थापनेबद्दल घाई नाही,’ असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनीही हे सरकार अंतर्गंत विरोधामुळंच पडेल असं विधान राऊत- फडणवीसांच्या भेटीनंतर केलं होतं. गेल्या नऊ महिन्यांपासून सरकार पडणार अशी चर्चा सुरू आहे. पण फडणवीस, मी, आम्ही पुन्हा सरकार बनवणार असं, म्हटलं नाही. पण हे सरकार अंतर्गत विरोधामुळं पडेल, असं आम्ही म्हणतोय. आम्ही हे सरकार पाडणार नाही, ती आमची संस्कृती नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होत.

फडणवीस शत्रू नाहीतः राऊत

मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसंच, विरोधीपक्ष नेते आणि बिहार भाजप प्रभारी आहेत. फणडवीस आणि मी काही शत्रू नाही. आमच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे.

आता एनडीए राहिली नाही

‘अकाली दलाच्या बादल यांनी एनडीएतून बाहेर पडणं दुःखद. आम्ही सर्वजण जुने सहकारी आहोत. सत्ता नसतानाही सेना- अकाली दल भाजपसोबत होते. शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडावं लागलं आता अकाली दलही एनडीएतून बाहेर आहे. एनडीएला आता नवीन सहकारी मिळाले आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण, ज्या युतीमध्ये शिवसेना आणि अकाली दल नाही त्या युतीला मी एनडीए मानत नाही,’ असं रोखठोक मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर, ‘आम्ही अजूनही पंतप्रधान मोदींना नेता मानतो,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here