म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ: येथील सर्कस मैदान परिसरातील एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याचे करत, त्या मुलाला ७० हजार रुपयांत एका महिलेला विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अंबरनाथ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चिमुकल्याची विक्री करणाऱ्या टोळीसह एक विवाहित ग्राहक महिला अशा पाच आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी चिमुकल्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. त्यामुळे अंबरनाथ पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

अंबरनाथ पश्चिम भागातील भाजी मार्केटजवळील नगरपालिकेच्या सर्कस मैदानावर झोपडपट्टीत लिलिया मंडळ ही महिला गेल्या तीन वर्षांपासून आपल्या कुटुंबासोबत राहते. मात्र, १५ सप्टेंबरला लिलियाचा मुलगा विकास हा आपल्या भावंडासोबत खेळत असताना अचानक गायब झाला. याप्रकरणी त्याच्या कुटुंबाने अंबरनाथ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पोलिसांनीही या चिमुकल्याच्या शोधासाठी तपासाची चक्रे फिरवत अनेक पथके तयार केली होती. तर विकास हा नेरळ येथील धामोटे साखरे बाग, पामपोडी रोड येथील एका फार्म हाऊसवर असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, अपहरण झालेला मुलगा आणि फार्म हाऊसवरील मुलगा मिळता जुळता असून, तो इरफान भंगारवाला यांचा मुलगा असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी विकासचे फोटो सर्व रिक्षांवर लावत त्याचा तपास सुरू केला. त्यानुसार रिक्षाचालकांकडूनच मिळालेल्या माहितीतून अपहरण झालेला विकास हा उल्हासनगर येथील भरतनगर येथे असल्याची माहिती मिळाली. मात्र, या मुलाला राहुल निकम आणि त्याची पत्नी पूजा हिने विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात हजर केले होते. तर या मुलाला आपल्या दारात कोणी सोडून गेल्याचे राहुल याने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच आपण हा मुलगा सर्कस मैदान परिसरातील जयनतबी मोहम्मद खान या महिलेकडून ७० हजार रुपयांत विकत घेतल्याची कबुली पूजा शेट्टीयार हिने दिली.

पोलिसांनी या प्रकरणी पूजा शेट्टीयार (२८), जयनतबी खान (३३), शेरू सरोज (४५), मुकेश खारवा (३६) आणि माया काळे (३०) या पाच आरोपींना सहाय्यक पोलिस आयुक्त विनायर नराळे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केल्याची माहिती अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली आहे. तसेच विकासला त्याच्या पालकांकडून सुखरूप सोपवले आहे. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने अल्प कालावधीत केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here