मुंबईः गेल्या सहा महिन्यांपासून पोलिस अहोरात्र झटत आहेत. या काळात पोलिसांनाही संसर्गाची झपाट्याने लागण होत असल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांत १६९ पोलिसांना करोनानं गाठलं आहे तर दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

पोलिस दलाला बसलेला करोनाचा विळखा दिवसेंदिवसे अधिक घट्ट होताना दिसत आहे. लॉकडाउन काळात विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात होती. अनावश्यक फिरणाऱ्यांना सुरुवातीला पोलिसांनी जसा काठ्यांचा प्रसाद दिला; तसेच शहरात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना पोलिसांनीच सुखरूप त्यांच्या राज्यात परत पाठविण्याचे कामही केले. या काळात करोनाचा सामना करताना सर्वांत जास्त ताण पोलिस यंत्रणेवर पडला.

रस्त्यावर बंदोबस्त करताना आत्तापर्यंत २२ हजार ६२९ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर, २४१ पोलिसांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. यामध्ये २४ अधिकारी आणि २१७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, करोनाची बाधा झालेल्या पोलिसांमध्ये २ हजार ४७३ अधिकारी आणि २० हजार १५६ कर्मचारी आहेत.

पोलिसांमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण वाढत असले तरी, बरे होण्याऱ्यांची संख्याही समाधानकारक आहे. आत्तापर्यंत १९ हजार १९८ जणांनी करोनावर मात केली आहे. यामध्ये १ हजार ५२ अधिकारी व १७ हजार १४६ कर्मचारी आहेत. तर, सध्या ३ हजार १९० पोलिसांवर उपचार सुरू आहेत.

अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन होते, का नाही हे पाहण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला जात आहे. मास्क न घालणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. दुकानात गर्दी होऊन संसर्ग वाढू शकतो; म्हणून गस्त सुरू आहे. करोना रोखण्यासाठी पोलिस दल रात्रंदिवस पहारा देत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here