मुंबई : भारतीय स्टेट बँकेने डिपॉझिटवरील (ठेवी) व्याजदरात कपात केली आहे. ‘एसबीआय’ ने ठेवीदर ०.१५ टक्क्याने कमी केला असून यामुळे बँकेच्या ठेवीदारांना झटका बसला आहे. दोन कोटींहून कमी रकमेच्या ठेवींवर नवे व्याजदर १० जानेवारीपासून लागू झाल्याचे बँकेने म्हटलं आहे.
‘एसबीआय’च्या वेबसाईटनुसार १ ते १० वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर बॅंकने कमी केला आहे. एक वर्षांहून अधिक मुदतीच्या ठेवीसाठी आता ६.१० टक्के व्याज मिळेल. यापूर्वी त्यावर ६.२५ टक्के व्याजदर होता. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वर्षाहून अधिक कालावधीच्या ठेवीवर ६.६० टक्के व्याजदर मिळेल. यापूर्वी तो ६.७५ टक्के होता. नव्या व्याजदर कपातीने सर्वसामान्य ठेवीदारांच्या व्याजावरील उत्पन्नात घट होणार आहे.
यापूर्वीही बँकेने कमी केला आहे. १ नोव्हेंबर २०१९ पूर्वी एक लाखांपर्यंत शिल्लक असलेल्या बचत खात्यावर ३.५० टक्के व्याजदर होता. मात्र त्यात कपात करून तो ३.२५ टक्के करण्यात आला. एक लाखांहून अधिक शिल्लक असलेल्या बचत खात्यावर ३ टक्के व्याज आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times