>> पं.

दीदीचा, उद्या ९१ वा वाढदिवस… मी तिला कधी विसरूच शकत नाही; त्यामुळे ती माझ्या सतत स्मरणात असते. तिच्या आठवणींच्या माळेचा मी जप करीत असतो. तिच्या वाढदिवसामुळे असंख्य आठवणींचा एक चलचित्रपट माझ्या मन:चक्षुंसमोरून सरकत आहे, त्यातल्याच या काही आठवणी… अगदी दीदीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असताना मी बाहेर बसलो होतो, तेव्हा ज्या आठवणी मनात आल्या, विचार मनात आले, ते मी रसिकांसमोर मांडत आहे. हे माझे हृदगतच आहे म्हणा ना!…

वातावरण ओलसर शिरशिरी आणणारं. एक नाजूक सर येऊन गेली असावी; कारण मृद्गंध अंगाला हलका हलका स्पर्श करतोय. सर हलकी असावी; कारण वृक्ष, लताकुंज, रानफुलं सारी पेंगुळल्यागत भासताहेत. प्रकाशाचा एक पहिला नाजुक किरण दवामध्ये स्वत:ला भिजवून जाईच्या पानावर काही तरी लिहू लिहू पाहतोय. त्यानं आपल्याही अंगावर काही कलाकुसर करावी, म्हणून इवली इवली रानफुलं त्या किरणाच्या अंगाला झोंबताहेत; त्यामुळे रानफुलांनी सोनेरी मुकुट घातल्याचा भास होतोय. काय लिहीत असावा तो किरण? काय लिहितोस रे? माझ्यावर कविता लिहिणार आहेस का? का पत्र? छे. कविता नाही, पत्र नाही, मी आचार्य अत्र्यांचं भाषण लिहितोय. आज लता मंगेशकरांचा वाढदिवस आहे. आज आचार्यांचं भाषण आहे. ‘एवढे मोठे आचार्य आणि तू भाषण लिहिणार?’

‘काय करणार? ते नेहमीसारखे पहाटे बागेत गेले आणि हात वर करून म्हणाले, हे निसर्गदेवते आज साऱ्या निसर्गाचा नाजूकपणा, कोमलपणा मला दे. आज निसर्गकन्येवर मला बोलायचे आहे.’

कळी हसून म्हणाली, ‘अरे वेड्या, ते भाषण काल झालं. मी एका वेणीत अडकले होते. जिच्याबद्दल भाषण होतं, तिच्या वेणीत मी ठाण मांडलं होतं. सारं भाषण मी नीट ऐकलं. आचार्य जे बोलले, ते मी तुला मुद्दाम ऐकवते; कारण तुझा उल्लेख होता त्यात. हं ऐक!’

‘प्रभातकाळची कोवळी किरणं दवबिंदूंमध्ये भिजवलेल्या शाईने, कमलतंतूंच्या लेखणीने, वायुलहरींच्या हलक्या हाताने फुलपाखरांच्या पंखांवर लिहिलेले मानपत्र गुलाबकळीच्या करंडकातून लताला अर्पण करावे.’

ज्या लता मंगेशकरांवर साहित्य सम्राट इतके भरभरून बोलले, ती माझी मोठी बहीण- दीदी! बाबा गेले आणि दीदी थकलेली माय झाली. तिचा थकवा आणि मायपण अक्षय आहे.

मास्टर विनायकांचे चित्रण सुरू होते. कोल्हापूरचे ऊन, पत्र्याचे ते कलामंदिर तापलेले. चार सहस्र दाबाचे ते आग ओतणारे दिवे, अंगाची लाही होतेय, प्रसंग संपल्याशिवाय विश्रांती, भोजन नाही. सगळी कडक शिस्त. चित्रपट ‘गजाभाऊ’. अनाथ मुलीचे काम दीदीच्या वाट्याला. रंगभूषा करण्याची आवश्यकता नाही. नियतीने डोळ्यांत, कपाळावर, हातावर मोठ्या बापाची, मोठ्या लाडाची; पण आज संगीत सूर्य मावळल्यामुळे संधिप्रकाशात बसलेली पोरकी पोर, हे जणू लिहूनच ठेवलेले. तेवढ्यात विनायकराव म्हणाले, ‘चला शॉट सुरू करा. नलिनी तू या लतावर उगाच राग काढते आहेस. तुझं मन भरत नाही, म्हणून तू लताच्या गालावर एक जोरदार थप्पड मारतेस. चला सीन सुरू करू या. लता तू इथे उभी राहा आणि नलिनी तू इथे उभी राहा. हं सीन सुरू करा.’

अचानक ते गरम दिवे पेटले. रंगभूषेचे सामान घेऊन रंगभूषाकार धावपळ करू लागला. प्रसंगाची तालीम झाली आणि मुख्य शॉटला सुरुवात झाली. एकदम मास्टर विनायक ओरडले, ‘कट, कट शॉट.’ सगळे शांत झाले. परत मास्टर विनायकराव ओरडले, ‘थोबाडीत असे मारतात? तू तर गोंजारले तिला. चला, पुन्हा शॉट घ्यायचा.’ असे अनेक शॉट झाले. ती दुसरी नायिका नलिनी, दीदीच्या थोबाडीत मारू शकायची नाही. शेवटी मास्टर विनायक वैतागले, ‘नलिनी, नलिनी असं नाही. थोबाडीत असं मारतात,’ आणि अभिनयाच्या ‌आवेशात त्यांनी दीदीच्या कानफटाखाली चांगलाच आवाज काढला. दीदी फक्त चौदा वर्षांची. अत्यंत कृश अशी मुलगी. त्या उलट मास्टर विनायक चांगलेच अडदांड. त्यांचा चुकून लागलेला घाव दीदी सहन करू शकली नाही. नाव लता, लतेसारखी भूमीवर कोसळली. धैर्यधराची अत्यंत लाडकी लता, जमिनीवर बेशुद्ध होऊन पडली होती.

‘दीदी डोळे उघड, डोळे उघड दीदी…’ रचना, उषाताई विनवित होत्या; पण दीदी डोळे उघडत नव्हती. शेवटी मी खाली वाकलो. ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या व्याकूळतेने दीदीला विनंती केली आणि आश्चर्य, दीदीने डोळे उघडून माझ्याकडे पाहिले.

… ७६ वर्षांपूर्वी दीदी कोल्हापूरला अशी बेशुद्ध झाली होती आणि मी हट्ट करताच तिने डोळे उघडले होते. त्यावेळी मी इतका लहान होतो, की झोपलेली व्यक्ती आणि बेशुद्ध झालेली व्यक्ती हा फरक मला कळत नव्हता. कोल्हापूरला दीदी शुद्धीवर आली, तर तिच्या कडेवर बसण्याचा मी हट्ट केला होता आणि तिनेही आनंदाने पुरविला होता… ७६ वर्षांपूर्वी तिने माझा हट्ट पुरविला, आजही तिने डोळे उघडून माझा हट्ट पुरविला. तिने डोळे उघडून माझ्याकडे पाहिले. अरे बाप रे! तिच्या डोळ्यांत राग होता. फार चांगल्या विश्वातून मी तिला खेचून आणले होते की काय? आता मी ८३ वर्षांचा… माझ्याकडे दीदीने कधीच रागावून बघितले नव्हते. मग आता हॉस्पिटलच्या शय्येवरून ती माझ्यावर का रागावली आहे? त्याही परिस्थितीमध्ये मला हसू आले. तिच्या स्मरणशक्तीचे कौतुक वाटले.

झाले काय होते, साक्षात्कार झाल्यासारखा मी पुण्याहून मुंबईला निघून आलो होतो. पुण्याला मी सारखा अस्वस्थ होतो. काय झाले ते कळत नव्हते. मुंबईला दीदी ठीक होती, सगळे ठीकठाक होते, मग मी अस्वस्थ का होतो? मी मुंबईला आलो. दीदीची प्रकृती बरी नव्हती; पण काळजी करण्याजोगी नव्हती. दुसऱ्या दिवशी दीदी, मी, उषाताई बोलत बसलो होतो. सारे काही ठीक होते. फक्त मी अस्वस्थ होतो. अचानक उषाताई म्हणाली, ‘बाळ, काही तरी गडबड आहे. तुला काय वाटतं?’ मीही अचानकपणे उषाताईला म्हणालो, ‘मला दीदी बरी वाटत नाही. आपण तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करू या.’ उषाताई चिंतेने म्हणाली, ‘ती माझं ऐकत नाही. तू बोलून बघ.’ मी लगेच दीदीच्या खोलीत गेलो. दीदीला म्हणालो, ‘काही तपासण्या करणं आवश्यक आहे. आपण दोन दिवस हॉस्पिटलमध्ये जाऊ या.’ दीदी शांतपणे म्हणाली, ‘मी चांगली आहे. मी हॉस्पिटलमध्ये जाणार नाही आणि विषय इथेच बंद कर. त्या उषानं, त्या डॉक्टरनं मला दोन दिवस भंडावून सोडलं आहे.’ ‘दीदी, मला असं वाटतं, की तू डॉक्टरांचं ऐकावंस.’

दीदी एकदम उसळून म्हणाली, ‘धीराच्या गोष्टी तू मला शिकवतोस? तू कोणाशी बोलतो आहेस? धीर धरून जगण्याशिवाय, लढण्याशिवाय मी आणि मी केलेय काय? बाळ माझ्या छातीवर वार आहेत, पाठीवर नाहीत. हा अहंकार नाही. हे वास्तव आहे. मी स्वाभिमानी आहे; पण स्वाभिमानाची मर्यादा मी कधीच ओलांडत नाही. स्वाभिमानाचा अतिरेक म्हणजे डाव्या हातात अहंकाराचा अन् उजव्या हातात गर्वाचा हात धरण्यासारखे आहे. राम-कृष्णही आले गेले, त्याविण का जग ओसचि पडले? एक लता गेली म्हणजे जग ओस पडणार आहे? मृत्यूला किती घाबरायचे ते! तुझा धीर सुटलाय, मला शिकवतोस धीर धर म्हणून.’

मी ओळखले की दीदी फार आजारी आहे. अत्यंत मितभाषी, अबोल दीदी इतके बोलते आहे, म्हणजे तिला बरेच नाही. ‘दीदी, तुला धीराच्या गोष्टी शिकवणं हा मूर्खपणा मी मान्य करतो. तुझ्याकडे हट्ट धरतो, की हॉस्पिटलमध्ये चल.’ दीदी काही बोलली नाही. तिचा अबोलपणा हा होकार धरून आम्ही तिला ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये नेले. मग मला जाणवले, की हिला काही स्मरत नाही. स्मरतेय ते फक्त ‘धीर धर’ हे आपले वाक्य आणि तिला आलेला राग अजूनही आहे. लता मंगेशकर होणे असे सहज आहे! त्याला हा मनस्वी स्वभाव जन्मजात लाभावा लागतो. तेवढ्यात डॉक्टर मला म्हणाले, ‘प्रकृती गंभीर आहे. आयसीयूमध्ये हलवले पाहिजे.’ ‘मग कोणाची वाट पाहता? लगेच हलवा.’ ‘तुमच्या संमतीची आणि सहीची,’ डॉक्टर गंभीरपणे म्हणाले.

पुढचे सारे सोपस्कार होऊन, २३ दिवसांनी दीदी ठीकठाक होऊन घरी आली. दोन दिवसांनी डॉक्टर घरी आले. पथ्यपाणी, औषधे सांगून त्यांनी मला बोलावून घेतले. ‘पंडितजी, मी तुम्हाला बरेच दिवस ओळखतो; पण तुम्ही इतके कठोर किंवा कोरडे असाल, असे मला वाटले नव्हते. दीदी किती गंभीर परिस्थितीमध्ये होत्या, तुम्हाला माहीत आहे? अशा अवस्थेत तुम्ही सर्व काही ठीक आहे असे वावरत होता. तुम्ही घाबरला नाहीत. तुमचा चेहरा कधी काळजीत दिसला नाही. दीदी तुमच्यावर किती प्रेम करतात. तुम्ही इतके शांतपणे कसे राहू शकलात?’ डॉक्टर एका दमात बोलून गेले आणि थोडे ओशाळले होऊन मला म्हणाले, ‘क्षमा करा. मला राहावलं नाही, म्हणून मी इतकं बोललो; पण खरं सांगा, तुम्ही इतके शांत कसे राहू शकला? तुम्ही स्थितप्रज्ञ आहात?’ मी म्हणालो, ‘डॉक्टर, तुमचं दीदीवर फार प्रेम आहे, म्हणून इतक्या आपलेपणानं तुम्ही आपलं मन माझ्यासमोर मोकळं केलंत. आता सांगतो, मी स्थितप्रज्ञ वगैरे नाही. हा मंगेशकरांचा स्वभाव आहे. माझ्या जागी दीदी असती, तर ती अशीच वागली असती. माझ्या अतिशय गंभीर आजारात ती अशीच शांत होती. हा आनुवंशिक गुण आहे. अहो, माझ्या वडिलांचा मृत्यू माझ्यासमोर झाला. तेव्हा मी फक्त साडेचार वर्षांचा होतो. त्यांनी माझ्याकडे हसून पाहिलं आणि प्राण सोडले. शेवटच्या प्रतिमेत हे हास्य पकडलं गेलं, ते तुम्ही पाहू शकता. डॉक्टर, मी कोरडा नाही; पण दीदीच्या स्वभावाबद्दल मला विलक्षण आत्मविश्वास आहे. सत्तर वर्षं अब्जावधी रसिकांना तिनं आनंद दिला आहे. त्या रसिकांच्या सदिच्छा, शुभेच्छा, आशीर्वाद तिच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत आणि माझा नव्हे, तिचा स्वभाव स्थितप्रज्ञेपलीकडे आहे.’

‘अरे कहेता है कौन नालाएबुलबुल को बेअसरपरदे में गुल के लाख जिगरबस्स चाक हो गये’

कोण अशी वल्गना करतो, की कोकिळेचा स्वर बेअसर आहे. फुलाची पाकळी उलगडून बघा, त्याच्या हृदयाचे लाखो तुकडेच तुम्हाला दिसतील.
दीदीने सुख-दु:ख, ऐश्वर्य, नाव, शोहरत, सन्मान इतके भोगले आहेत, की ती शांत झाली आहे. ‘परे ही परते’ची तिची मानसिक अवस्था आहे. तिने गायलेल्या हजारो गाण्यांच्या सुरावटीत ती झोल झोल झुलतेय… तिच्या या स्वभावाबद्दल मला इतकी खात्री होती, की ती मृत्यूलाही म्हणेल,

‘आज फिर जीने की तमन्ना हैआज फिर मरने का इरादा है…’

डॉक्टर, ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले,’ हे जिला उमगले आहे, तिच्याबद्दल कसली काळजी? डॉक्टर, आयुष्यात एक गाणं गा, मग माझ्या मनाची अवस्था तुम्हाला कळेल.’

तेवढ्यात आतून निरोप आला, दीदी सर्व नर्सेसना काही भेटवस्तू देत आहे. तुम्ही आत या. आम्ही सर्व आत गेलो. प्रसन्न मुद्रेने दीदी तिच्या अश्विनी परिचारिकेला बक्षिस देत होती. मोत्याचा फार सुंदर सर होता तो. टपऽऽ असा नाजुक ध्वनी उमटला. दुसरा सर दीदीच्या हातून निसटला होता. त्याचा आवाज होता तो… टऽऽप.

टप टप टऽऽप ध्वनी उमटत होते. एकेक मणी फरशीवर आपटत होता…

… १९४५ मध्ये मास्टर विनायकरावांची सिने कंपनी कोल्हापूरहून मुंबईला आली. कोल्हापूर सोडून, आई-भावंडांना सोडून दीदीला मुंबईला जावे लागले. सोबत मीनाताई होती. एक पंधरा वर्षांची मुलगी, दुसरी तेरा वर्षांची.

अफाट शहर मुंबई आणि या दोन मुली. दिवसा भीती, रात्र दहशतीची.

मास्टर विनायकांनी शिवाजी पार्क येथे भाड्याने एक बंगला घेतला. बंगल्याचे नाव ‘आशीर्वाद’. पहिल्या माळ्यावर एका लहानशा खोलीत दीदी आणि मीनाताई राहत. दिवसभर ‘राजकमल’ रंगमंदिरात चित्रण चाले. रात्री जे अन्न असेल, ते खाणे, परत सकाळी चित्रण असा गाडा चालू होता. मास्टर विनायकांचे कुटुंब त्याच बंगल्यामध्ये
होते. १३ वर्षांची पहिली मुलगी, तिच्या पाठी चार भावंडे असा मोठा संसार वरच्या मजल्यावर राहत असे. ती मुले दीदी, मीनाताईबरोबर राहायची, खेळायची. मालकाची मुले, त्यांचे लाड आणि कौतुक कंपनीत चाले. स्वाभाविक होते ते; पण त्याच वयाची दीदी, मीनाताई यांच्याकडे दुर्लक्ष होई. कपड्यात, जेवणात, बोलण्यात, वागण्यात दोघींना परकेपण जाणवे. अलीकडे यू-ट्युबवर एक गाणे दाखविले जाते- अनाथाश्रमाची मुले वर्गणी गोळा करताहेत आणि

‘चला चला नवबालागुंफू चला सुममाला…’

हे समूहगीत गात आहेत. त्या अनाथ मुलांचे काम आम्ही पाच भावंडांनी केले होते.

कोल्हापूरच्या शालिनी पॅलेसच्या बागेमध्ये चित्रण होते. वरून ऊन, पोटी भूक, पायी धूळ अशी परिस्थिती संध्याकाळपर्यंत होती. चित्रण संपले. सर्वजण रंकाळा तलावाच्या काठाने घरी निघाले. मी आशाताईकडे गेलो आणि हात वर करून उभा राहिलो. तिने माझ्याकडे मायेने पाहिले आणि एका झटक्यात उचलून मला कडेवर घेतले. मग त्या धुळीवर पावले उमटवत पाच पोरके निघाले घराकडे. आशाताई लहान होती. भविष्यातले गाणे गुणगुणत चालली होती,

‘जिवलगा राहिले रे दूर घर माझेपाऊल थकले माथ्यावरचेजड झाले ओझे…’

मास्टर विनायकांच्या घरात दीदीला पोरकेपणा फार जाणवे. काहीच वर्षांपूर्वी ती वडिलांच्या बंगल्यात होती. आई होती, भावंडे होती, सारे काही होते आणि आज… आज ती आश्रित होती. अनाथ होती. पोरकी पोर होती. क्षणाक्षणाला तिच्या स्वाभिमानी स्वभावाला ठेच लागत होती. अस्वस्थ होती ती आणि…

रविवार होता. सगळे घरी होते. मोठे झोपले होते. बायका विश्रांती घेत होत्या. मुले खेळत होती. एका खोलीत दीदी, बेबी नंदा, मीनाताई, सुभाष ही मंडळी गप्पा मारत बसली होती. तोच नंदाने एक हार खिशातून बाहेर काढला. दीदीला हार दाखवत ती म्हणाली, ‘चल लता, आपण हार हार खेळू या.’ हार बघून दीदीच्या पोटात खळगा पडला. तो हार वहिनींचा होता. आता वहिनी काय म्हणतील… दीदी घाईघाईने नंदाकडे गेली, ‘नंदा बेटा, तो हार मला दे. तो आपण आईला परत करू…’ ‘छे छे, ती माळ माझी आहे. मी हिच्याबरोबर खेळणार’ आणि ती, तिची भावंडे माळेबरोबर खेळू लागले.

दीदीच्या मनातली भीती खरी ठरली. माळेचा दोरा तुटला आणि एकेक मोती टप्प टप टप करीत फरशीवर आपटू लागले. त्या प्रत्येक टप टपबरोबर दीदीच्या हृदयाचे ठोके चुकायचे.

कोठे मोती हरवला तर?कोठे फुटला तर?कोणी चोरला तर?

हे सारे बालंट माझ्यावर येईल. वहिनी म्हणतील, माळ हिने चोरली. अब्रू जाईल. मीना, चल विखुरलेले मोती त्या गुळगुळीत फरशीवर शोधू या. मग दोघी खाली बसल्या आणि मोती शोधू लागल्या. कपाटा खाली, खाटेच्या खाली. सर्व कोने, खड्डे पाहून एकेक मणी शोधला. मग ते सर्व मणी मोजले. पिशवीत घातले आणि ती पिशवी वहिनींना दिली.

‘भारी वस्तू विचारून घ्यावी लता,’ आणि त्या निघूनही गेल्या. दीदीचा अचंब्याने आऽऽऽच राहिला. हे मोती शोधण्यासाठी आपण इतके कष्ट घेतले. अशा मोत्यांच्या सरी बाबा त्यांच्या अंगाखांद्यावर सोडायचे. मुली खेळायला निघून गेल्या. सुन्न होऊन दीदी, मीनाताई तेथेच उभ्या होत्या.

तोच मॅनेजरचे शब्द, ‘लता, तू वहिनीचा हार तोडलास? तुझ्या बापाने तरी असा हार पाहिला होता का?’

मीनाताईला फार राग आला. ती काही तरी बोलणार, तेवढ्यात दीदीने तिला अडविले. ती सरळ मास्टर विनायकांच्या खोलीत गेली. ‘ये, ये लता. बस,’ विनायकराव म्हणाले.

‘मी इथे बसायला नाही आले. मी जायला आले आहे. तुमचं घर मी या क्षणी सोडतेय. बाबांचा अपमान ज्या घरी झाला, त्या घरात मी राहणार नाही.

‘कुठं जाणार तू? ही मुंबई आहे. फार मोठं शहर, हरवशील बेटा.’

‘मी हरवले तुमच्या घरात. या घरात मी माझी अस्मिता हरवून बसले आहे… विनायकराव मी निघाले. चल मीना, इथे भिऊन भिऊन जगण्यापेक्षा वाघासारखी एक गोळी खाऊन मरू.’

‘लता, डोक्यात राख घालू नकोस.’

‘नीट विचार केलाय मी. अभिनय हे माझं क्षेत्र नाही. माझ्या क्षेत्रात आता मी मुक्तपणे, विहंगाप्रमाणे विहार करणार. विनायकराव मुंबई फार मोठी; पण… सब भूमी गोपाल की. इतनी बडी भूमी में,

‘एकला चॉलो रे का हाथ पकडचालां वही देस करूंगी…’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here