पंजाबने ठेवलेले २२४ धावांचे आव्हान राजस्थानच्या संघाने लीलया पेलले. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना चांगलाच रंगतदार झाला. या सामन्यात राजस्थानने विजय मिळवल्यावर गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. गुणतालिकेत नेमका कोणता बदल झाला, पाहा…

या सामन्यापूर्वी पंजाबचा संघ हा दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे हा सामना जिंकून पंजाबचा संघ सहजपणे पहिल्या स्थानावर पोहोचू शकला असता. दुसरीकडे राजस्थानचा संघ हा या सामन्यापूर्वी चौथ्या स्थानावर होता. दिल्ली, पंजाब आणि मुंबई यांच्यानंतर राजस्थानचा चौथा क्रमांक येत होता. पण या सामन्यानंतर सर्वच समीकरणं बदलल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यातील विजयानंतरही दिल्लीचे गुणतालिकेतील स्थान अव्वल राहिले आहे, त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. पण राजस्थानने या विजयानंतर थेट चौथ्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. कारण आता दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला असल्यामुळे त्यांना दुसरे स्थान मिळाले आहे.

पंजाबचा संघ सामन्यापूर्वी दुसऱ्या स्थानावर होता. कारण यापूर्वी झालेल्या दोन सामन्यांपैकी पंजाबला एक सामना जिंकता आला होता, तर एका सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. आजच्या तिसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता पंजाबचा संघ हा तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा संघ हा तिसऱ्यावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे.

पंजाबच्या २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची चांगली सुरुवात झाली नाही. कारण राजस्थानच्या संघातून आज पहिलाच सामना खेळणाऱ्या जोस बटलरला यावेळी फक्त चारच धावा करता आल्या. त्यानंतर राजस्थानचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि संजू सॅमसन यांची जोडी चांगलीच जमली. या सामन्यातही स्मिथ आणि संजू यांची जोडी जमल्याचे पाहायला मिळाले. पण यावेळी स्मिथ बाद झाला आणि ही जोडी फुटली. स्मिथने यावेळी २७ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर स्मिथ आणि संजू यांच्यांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी पाहायला मिळाली.

स्मिथ बाद झाल्यावर संजूने जोरदार फटकेबाजी केली, पण त्याला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. संजूने ४२ चेंडूंत चार चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर ८५ धावांची खेळी साकारली. संजू बाद झाल्यावर सुरुवातीला सावध खेळणाऱ्या राहुल टेवाटियाने १८व्या षटकात पाच षटकार लगावले आणि सामना राजस्थानच्या बाजूने फिरवला. राहुलने यावेळी ३१ चेंडूंत सात षटकारांच्या जोरावर ५३ धावांची दमदार खेळी साकारली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here