वाचा:
नागपूरमध्ये करोना मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी ‘ ही मोहीम घेऊन महाराष्ट्र करोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत अनेक खासगी रूग्णालये शासकीय नियमानुसार रुग्णसेवा करत आहेत, पण काही खासगी हॉस्पिटल, खासगी तपासणी प्रयोगशाळा, प्लाझ्मा प्रयोगशाळा याठिकाणी रुग्णांची लूट होत असल्याचे पुढे आले आहे. लोकप्रतिनिधी तसेच पोलिसांकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा वेळी शासकीय नियमाची पायमल्ली करून अतिरिक्ति पैशांची मागणी करणाऱ्या वैद्यकीय आस्थापनांना मोकळीक दिली जाणार नाही, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
वाचा:
आजपासून स्टिंग ऑपरेशन
महानगरपालिका, पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन या विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणारे वेगवेगळे चमू तयार करून नागपूर शहरातील विविध खासगी हॉस्पिटल, लॅब व प्रयोगशाळांना आकस्मिक गुप्त भेटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोमवारपासून ही कारवाई सुरू करण्यात येईल, असे देशमुख यांनी यावेळी सांगितले.
टोल फ्री क्रमांक जाहीर
यासाठी पोलीस विभागाचा टोल फ्री क्रमांक १०० आणि व्हाटसअॅप क्रमांक ९८२३३००१०० जाहीर केला आहे. सामान्य नागरिक दोन्ही क्रमांकावर अडवणूक केल्याची तक्रार नोंदवू शकतील. त्यानंतर संबंधित आस्थापनाला या संदर्भातील जाब विचारला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
वाचा:
होम क्वारंटाइन व्यक्ती बाहेर पडल्यास दंड
शहरांमध्ये करोना मृत्यूदर एकीकडे वाढत असताना काही बेजबाबदार नागरिक होम क्वारंटाइन असताना देखील बाहेर फिरत आहेत. स्वतःसोबत, स्वतःच्या कुटुंबासोबत, समाजातील नागरिकांचा जीव देखील धोक्यात आणत आहे. अशा बेजबाबदार लोकांवर कारवाई करण्यात येईल. यासाठी आता गृह अलगीकरणात असणाऱ्या नागरिकांना स्टॅम्प मारण्याचे देखील सुचित करण्यात आले आहे. नागरिकांनी सध्याच्या परिस्थितीत काम नसताना घराबाहेर पडूच नये. तसेच मास्कचा वापर करावा. मास्क न वापरल्यास पाचशे रुपये दंड आकरण्यात येत आहे. सोमवारपासून अधिक सक्तीने ही मोहीम राबविण्याचे निर्देश पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही परिस्थितीत नागपूर शहर व जिल्ह्यातील करोना मृत्यूदराची संख्या कमी करायची आहे. यासाठी नागरिकांनी आणखी चांगल्या प्रकारे सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.
नागरिकांनी महानगरपालिकेने जारी केलेल्या टोल फ्री क्रमांकावरूनच हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी पर्याय निवडावा. खासगी हॉस्पिटलचे महानगरपालिकेमार्फत ऑडिट होत असून अशा पद्धतीची लूट होत असल्यास महानगर पालिकेच्या ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर लक्षात आणून द्यावे. तसेच मास्क वापरणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times