एक कलाकार म्हणून अभ्यास करण्याच्या दृष्टीनं मी वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बघत असतो. चित्रपट बघणं माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरलं आहे. एरवी कामात व्यग्र असल्यामुळे निवांत असा वेळ बऱ्याचदा मिळायचा नाही. पण, लॉकडाउनमध्ये कुठेही जायची घाई-गडबड नव्हती. सुरुवातीचे तीन महिने घरीच असल्यामुळे मी बरेच सिनेमे बघू शकलो. मी याकडे मनोरंजन म्हणून तर बघतोच; शिवाय माझ्यासाठी ती एक शिकण्याची प्रक्रिया असते. त्यातली पात्रं, कथा प्रेरणा देऊन जातात. चित्रपट बघताना त्यातील पात्रांनी त्यांच्या आयुष्यात साध्य केलेल्या गोष्टींकडे बघून प्रेरणा मिळते. ‘आपणही करू शकतो’ हा विचार येतो. हे चित्रपट बघताना त्यातून माझ्या कामात काय आणि किती उतरवता येईल याचा विचार मी करतो. तसंच अशा प्रकारचं काम मला कधी करायला मिळेल, या आशेनं नव्या जोमानं कामाला लागतो. मनोरंजन म्हणून एखादी गोष्ट करताना त्यातूनही अशी प्रेरणा मिळू शकते. सध्या लॉकडाउनमध्ये अनेक जण व्यायामाकडे वळले आहेत. पण, व्यायामाचा कंटाळा येणारे, अचानक सुरू कसं करायचं म्हणणारे, सोमवारपासून सुरू करू असं म्हणणारेही अनेक आहेत. अशांनी, नजीकच्या काळात साध्य करायच्या ध्येयाकडे लक्ष द्यायला हवं. व्यायामाच्या पहिल्याच दिवशी १०० बैठका कशा जमतील ? आधी दोन बैठका माराल, मग दोनाच्या पाच होतील, मग दहा…असं करत करतच आपण पुढे जातो. म्हणूनच सुरुवातीला छोटं ध्येय समोर ठेवून मेहनत केली, की अंतिम ध्येयापर्यंत आपण सहज पोहोचतो. हे समजून घेतलं की तुम्हीच तुमची प्रेरणा बनता आणि आत्मविश्वासही वाढतो.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times