कृषी विधेयकांच्या मुद्द्यावरून अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतरही मोदी सरकारनं त्यांच्याकडं दुर्लक्ष केल्यानं अखेर अकाली दलानं एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेनंतर अकाली दलाच्या रूपानं भाजपचे सर्वात जुने व सुरुवातीचे दोन्ही मित्र पक्ष आता बाहेर पडले आहेत. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून या घटनाक्रमावर भाष्य करताना भाजपला जोरदार टोले हाणले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही बाहेर पडल्याने राष्ट्रीय राजकारण बेचव झाले आहे, असा दावा शिवसेनेनं केला आहे.
वाचा:
‘आधी शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडावे लागले. आता अकाली दल बाहेर पडले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दोन प्रमुख स्तंभच बाहेर पडल्याने आता या आघाडीचे म्हणजेच एनडीएचे अस्तित्व खरोखर उरले आहे काय? हा प्रश्न आहेच. आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नक्की कोण कोण आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. जे आहेत त्यांचा हिंदुत्वाशी नक्की किती संबंध आहे? पंजाब आणि महाराष्ट्र ही दोन मर्दानी बाण्याची राज्ये आहेत. अकाली दल व शिवसेना हे त्या मर्दानगीचे चेहरे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणण्यापेक्षा भाजपप्रणीत आघाडी हाच उल्लेख करावा लागेल,’ असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे.
वाचा:
‘ज्या कारणांसाठी ‘एनडीए’ स्थापन झाली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले. अकाली दल हा ‘एनडीए’चा शेवटचा ‘खांब’ही कलथून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारण निस्तेज होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दोन सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. अनेक राज्यांत त्यांची सत्ता आहे. जेथे अल्पमत होते, तेथेही या ना त्या मार्गाने सत्ता मिळविली. केंद्रीय सत्तेचे बाहुबल हाती असले की, काहीच अशक्य नसते, पण सत्तेचे ‘गड’ जिंकले तरी एनडीएतील दोन सिंह मात्र गमावले आहेत, हे वास्तव कसे नाकारणार?,’ असा सवालही शिवसेनेनं केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times