हुसेन बाबूमिया मोमिन (वय ५८, रा. मिरज) असे मृताचे नाव आहे. त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. मिरज (Miraj) येथील सरकारी कोविड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज, सोमवारी पहाटेच्या सुमारास हुसेन यांनी आत्महत्या केली. चाकूने गळा कापून त्यांनी जीवन संपवले.
दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी मात्र याबाबत संशय व्यक्त केला असून, घाईगडबडीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नयेत, अशी भूमिका घेतली आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज मिळावे, असा आग्रह नातेवाईकांनी धरला आहे.
मिरजेतील शासकीय कोविड रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन बाबूमिया मोमिन यांना करोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना दहा दिवसांपूर्वी उपचारासाठी शासकीय कोविड रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास आरोग्य कर्मचाऱ्यांना मोमिन यांच्या बेडवर रक्त दिसले. जवळ जाऊन तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पहाटे तीनच्या सुमारास आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोमिन यांचा मुलगा मुस्तफा याला मोबाइलवरून घटनेची माहिती दिली. तसेच पोलिसांनाही कळवले. घटनेची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता, हुसेन मोमिन यांच्या गळ्यावर जखमा असल्याचे दिसले. त्याचबरोबर बाजूला चाकू पडला होता. मोमिन यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यानुसार रुग्णालय प्रशासनाने मृताच्या नातेवाईकांना माहिती दिली.
दरम्यान, मृत हुसेन मोमिन यांचा मुलगा मुस्तफा याने वडिलांच्या आत्महत्येबद्दल संशय व्यक्त केला आहे. ‘आत्महत्या करण्यासारखी वडिलांची मानसिक स्थिती नव्हती. रुग्णालय प्रशासनाने करोना वार्डातील सीसीटीव्ही फुटेज द्यावे. पोलिसांनी योग्य चौकशी करावी, त्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नयेत,’ अशी भूमिका मोमिन यांचा मुलगा मुस्तफा मोमिन याने घेतली आहे. करोनाबाधित रुग्णाने शासकीय रुग्णालयात आत्महत्या केल्याचे वृत्त पसरताच सांगलीत खळबळ उडाली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times