नगरसेवक माणिक पाटील यांचा मुलगा राकेश पाटील हा अचानक २० सप्टेंबर रोजी बेपत्ता झाला. पोलिसांनी राकेशचे मित्र, नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली. वाघबीळ, कासारवडवली भागातही शोध घेतला. तरीही तो सापडला नाही. त्याच दिवशी माणिक पाटील हे रुग्णालयातून उपचारानंतर घरी आले. मात्र घरातील तिजोरी फोडल्याचे निदर्शनास आले. राकेशच दागिन्याची चोरी करून निघून गेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केल्यानंतर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे बेपत्ता राकेशचा शोध घेण्याबरोबर चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते.
परंतु राकेश याची दुचाकी गौरव सिंग हा वापरत असल्याची माहिती पुढे आली. सिंग हा माणिक यांच्याकडे चालक म्हणून काम करत असून पोलिसांनी सिंग याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत राकेशच्या हत्येचा उलगडा झाला. ही हत्या त्याचा सावत्र भाऊ सचिन पाटील यांने सिंगच्या मदतीने केली होती. परंतु सचिन फरारी असल्याने त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली. अंबरनाथ, बदलापूर, कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबईमध्ये सचिनचा शोध घेण्यात आला. तो मोबाइल वापरत नसल्याने त्याला पकडणे सोपे नव्हते. अखेर पोलिसांनी सचिनला नवी मुंबईतील येथून अटक केली. राकेशच्या हत्येनंतर घरातील सोन्याचे दागिने चोरल्याची कबुलीच सचिन याने दिली असून, न्यायालयाने त्याला ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी गौरवला दोन लाख मिळणार होते, ही बाब चौकशीत निष्पन्न झाली आहे. या महत्वपूर्ण गुन्ह्याची उकल वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, पोलीस निरीक्षक प्रदीप उगले यांच्या पथकाने केली.
पार्टी, दारू आणि हत्या
हत्येपूर्वी सचिन पाटील, राकेश पाटील आणि गौरव सिंग या तिघांनी पार्टी केली होती. या पार्टीत राकेशला दारू पाजण्यात आली. त्यामध्ये गुंगीच्या औषधाच्या गोळ्या टाकल्या. त्यानंतर पहाटेच्या वेळी सचिन याने डोक्यात गोळी झाडून राकेशची हत्या केली आणि मृतदेह वाशी खाडी पुलावरून पाण्यात फेकून दिला. आरोपींनी घरातील तिजोरी फोडून दागिनेही चोरले असून राकेश हा अगोदर दुसरीकडे राहात होता. मात्र पुन्हा तो घरात राहण्यास आला. संपत्तीत वाटेकरी होईल म्हणून आरोपींनी राकेशची हत्या केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त एस. एस. बुरसे यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times