म. टा. प्रतिनिधी, नगर: नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका करोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. मात्र, या महिलेचा मृतदेह ताब्यात देताना सोन्याचे दागिने कोणीतरी काढून घेतले आहेत, अशी तक्रार संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाला तातडीने पत्र देत या घटनेच्या तपासासाठी संबंधित वार्डमधील सीसीटीव्ही फुटेज मागितले आहेत.

जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वार्डमध्ये उपचार घेत असणाऱ्या एका महिलेचा १८ सप्टेंबरला मृत्यू झाला. मात्र, या महिलेचा मृतदेह ताब्यात देताना तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने नव्हते. ते कोणीतरी काढून घेतल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी तसा तक्रार अर्ज तोफखाना पोलीस ठाण्यात दिला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने हालचाली करीत जिल्हा रुग्णालयाला पत्र देत सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘संबंधित महिला उपचार घेत असलेल्या वार्डमधील १८ सप्टेंबरचे दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासकामी देण्यात यावे.’ या पत्रावर पोलीस उपनिरीक्षक के. बी. घायवट यांची सही आहे.

दरम्यान, या प्रकाराबाबत घायवट यांच्याशी संपर्क केला असता, अद्याप आम्हाला रुग्णालयाकडून सीसीटीव्ही फुटेज मिळाले नसल्याची माहिती त्यांनी दिली. तर, जिल्हा रुग्णालयातील प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना संपर्क केला असता ते म्हणाले, ‘लवकरच पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज देण्यात येईल. तसेच याबाबत चौकशी सुद्धा करण्यात येत असून कोणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here