नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी आवाहन करून फटाके विक्रीचे तात्पुरते परवाने घेऊ इच्छीणाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ३१ ऑक्टोबरपर्यंत ठिकठिकाणच्या तहसिलदार कार्यालयात नेहमीच्या पद्धतीने आणि नेहमीची कागदपत्रे जोडून अर्ज करायचे आहेत. अर्ज तहसिलदार कार्यालयातच करायचे असून तेथूनच परवाने मिळणार आहेत. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. तोपर्यंत करोनाचे संकट कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
यापूर्वीच सरकारमधील अनेक मंत्र्यांनीही नोव्हेंबरपर्यंत करोना संपेल, अशी विधाने केलेली आहेत. सध्या राज्यातील अनेक ठिकाणी दिलासादायक परिस्थिती दिसून येत आहे. नव्या बाधितांचे आकडे काहीसे कमी होत आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणी अद्यापही परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे नवरात्राचे उत्सवही रद्द करण्याची वेळ आली आहे.
सणासुदीलाही घरातच बसून साधेपणाने सण साजरा करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. गर्दी होऊ नये म्हणून रक्षाबंधन आणि अन्य सणांच्यावेळी स्टॉलला परवानगी देण्यात आली नव्हती. आता दिवाळीचे काय होणार, असा प्रश्न पडलेला आहे. फटाके विक्रेत्यांना स्टॉल लावण्याची परवानगी देण्याची तयारी सुरू झाल्याने दिवाळी खुलीपणाने साजरी करता येईल, असे संकेत मिळू लागले आहेत. अर्थात फाटके फोडण्याला अनेकांचा विरोध असतो. सरकारी पातळीवरूनही त्यासंबंधी प्रबोधन केले जाते. मात्र, त्यावर अवलंबून असलेली विक्रेत्यांची कुटुंब आणि सरकारलाही मिळणारा महसूल याचाही विचार केला जातो. विक्रेत्यांनाही यावेळी परवाने मिळतील की नाही, याबद्दल साशंकता होती. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी परवाना अर्जही ऑनलाइन भरण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, प्रशासनाने अखेर नेहमीप्रमाणे पद्धत सुरू केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times