आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीवर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इरफान पठाणने खरमरीत टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. इरफानने यावेळी कोहलीच्या नेतृत्वावर टीका केली आहे.

आरसीबीची गोलंदाजी आतापर्यंत चांगली झालेली पाहायला मिळालेली नाही. इरफानने या गोष्टीवरच बोट ठेवले आहे. कोहली हा आपल्या संघातील गोलंदाजांचा वापर योग्यप्रकारे करत नसल्याचे इरफानला वाटते. कारण कोहली हा शिवम दुबे या युवा गोलंदाजाला अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी करायला देतो. हीच गोष्ट कुठेतरी इरफानला खटकली आहे.

इरफान म्हणाला की, ” आतापर्यंत आरसीबीच्या संघातील वेगवान गोलंदाज डेल स्टेनला चांगली कामगिरी करता आलेली नाही. तो महागडा गोलंदाज ठरत आहे. त्यामुळे स्टेनच्या जागी जर संघात ख्रिस मॉरिसला संधी दिली तर ते आरसीबीसाठी उपयुक्त ठरू शकते. माझ्यामते तरी युवा अष्टपैलू शिवम दुबेला कोहलीने अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी देऊ नये. कारण कोहलीकडे चांगले पर्याय उपलब्ध आहेत, कोहलीने नक्कीच या पर्यांयांचा विचार करायला हवा.”

इरफान पुढे म्हणाला की, ” कोहलीकडे शिवम दुबेपेक्षा नवदीप सैनी हा एक चांगला पर्याय आहे. कोहलीने त्याला अखेरच्या षटकांमध्ये किमान दोन षटके तरी द्यायला हवीत. कारण सैनी चांगले बाऊन्सर टाकू शकतो, त्याचबरोबर तो यॉर्कर चेंडूही अप्रतिमपणे टाकतो. त्यामुळे कोहलीकडे शिवम दुबेपेक्षा नवदीप सैनी हा नक्कीच चांगला पर्याय आहे. त्यामुळे अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी कोहलीने सैनीला जास्तीत जास्त संधी द्यायला हवी.”

आरसाबीच्या गोलंदाजांना गेल्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. डेल स्टेन आणि उमेश यादव हे दोघेही गेल्या सामन्यात महागडे गोलंदाज ठरले होते. त्यामुळे कोहली या सामन्यात आपली रणनिती बदलणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. पण कोहलीने या सामन्यातही ख्रिस मॉरिसला संधी दिली नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विराट कोहलीची रणनिती नेमकी काय आहे, हे अजूनही बऱ्याच जणांना समजलेले दिसत नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here