म. टा. प्रतिनिधी,

शहरातील विविध बँकांच्या एटीएमवर दररोज शेकडो ग्राहकांचा वावर असून, तेथे नियमित सॅनिटायजेशनची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे करोनाचा फैलाव होण्याची शक्यता वाढली आहे.

प्रत्येक नागरिकाला पैसे काढण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी एटीएमवर जावे लागते. बँकेत गर्दी करण्यापेक्षा बहुतांश जण एटीएमच्या माध्यमातून पैसे काढण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे शहरातील सर्व एटीएमवर गर्दी सतत गर्दी असते. शिवाय, एटीएम सेंटरचा दरवाजा, एटीएम, त्याचा बटणांना दररोज हजारो हातांचा स्पर्श होतो. त्यातील कोण करोनाबाधित किंवा करोना विषाणूवाहक असेल सांगता येत नाही. त्यामुळे पाठोपाठ येणाऱ्या ग्राहकाला दरवाजा, बटणांना हात लावण्याशिवाय पर्याय नसतो. बोटांवर मोजण्याइतके ग्राहक हातमोजे घालून येतात. मात्र, बहुतांश जण सुरक्षेची कुठलीही काळजी न घेताच एटीएम सेंटरमध्ये शिरत असल्याने त्यामुळे करोनाचा धोका वाढला आहे.

शहरातील प्रमुख बँकांकडून दिवसातून एकदा सॅनिटायइज केले जाते. मात्र, बहुतांश एटीएम केंद्रावर येणाऱ्या ग्राहकांना हात सॅनिटाइज करण्यासाठी सॅनिटायझरच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असून, बँकांनी त्यांच्यासाठी एटीएमवर सुरक्षिततेच्या आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

मास्क असूनही उपयोग नाही
याबाबत डॉ. योगेश थोरात म्हणाले की, अनेक लोक साधा मास्क लावून फिरतात. मात्र, ते फारसे उपयुक्त नसतात. शिंकल्यास या मास्कमधूनही ५० टक्के विषाणू बाहेर पडू शकतात. ‘एन ९५’ मास्क असेल तर बचाव होऊ शकतो. सर्दी-खोकला असलेल्या नागरिकांना त्यांच्या संसर्ग झालेला असेल आणि त्यांना त्याची माहिती नसेल तर हा धोका अधिक वाढतो. अशी व्यक्ती एटीएममध्ये शिंकल्यास त्यानंतर येणाऱ्या अनेक नागरिकांना त्याची बाधा होण्याची शक्यता असते. आजारी असलेल्या व्यक्तींनी शक्यतो सार्वजनिक ठिकाणी फिरणे टाळावे, असेही ते म्हणाले.

लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून फारसा धोका नाही, परंतु कोविड संसर्गित व्यक्ती एटीएममध्ये शिंकल्यास त्यापासून अनेकांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे एटीएमचा वापर करताना प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वत:ला सॅनिटाइज करण्यासह मास्क लावणे, हातमोजे वापरणे आवश्यक आहे.

– डॉ. योगेश थोरात, वैद्यकीय व्यावसायिक

ही घ्या काळजी

– एटीएम रुममध्ये इतर व्यक्ती असताना वापर टाळा

– नियमित आपले हात सॅनिटाइज करा

– एटीएमची बटणे दाबताना शक्यतो हातमोजे घाला

– एटीएम रुममधील इतर भागास स्पर्श टाळा

– सर्दी-ताप असल्यास एटीएम वापर टाळा

– शक्यतो डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करा

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here