अहमदनगर: नगरच्या शिवसेनेत जातीचे राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने केला आहे. याबाबत मुख्यमंत्री यांनाच या पदाधिकाऱ्याने पत्र पाठवले आहे. मनपा स्वीकृत नगरसेवक निवडीत हे जातीचे राजकारण केले जात असल्याचे या पत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नगरमधील शिवसेनेत दुफळी पडत असून गटबाजी असल्याच्या चर्चेला बळ मिळू लागले आहे.

वाचा:

महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड एक ऑक्टोबरला होणार आहे. मात्र यावरून शिवसेनेतील अंतर्गत वाद समोर येऊ लागला आहे. शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत शेळके यांनी तर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून शिवसेनेत जातीच राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे. शेळके यांनी पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, ‘नगरमध्ये आजपर्यंत दिवंगत अनिल भैया राठोड यांनी कधीही जातीचे राजकारण शिवसेनेत केले नाही. त्यामुळेच नगरमध्ये संघटना बळकट राहिली. परंतु काही दिवसापासून जातीचे राजकारण करून दिवंगत अनिल भैया राठोड यांना पराभूत केले होते. आजही स्वीकृत नगरसेवक भरतीवेळी जातीचे राजकारण करून दोन्ही उमेदवार एकाच जातीचे दिले आहेत. नगरची शिवसेना एक तर भाऊ कोरेगावकर यांनी व काही जातीवादी फुटीर शिवसैनिकांनी आपल्या पक्षाला गळती लावायचे काम करत आहेत. तरी आपण यात तातडीने लक्ष घालावे, व नगरच्या शिवसेनेमध्ये चाललेली धुसफूस थांबवावी. अन्यथा यापुढील काळात शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागेल,’ असेही त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. या पत्राची प्रत शेळके यांनी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख तसेच शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी देखील दिली आहे.

वाचा:

नगरच्या शिवसेनेत असलेल्या वाद यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे स्वीकृत साठी शिवसेना उमेदवार बदलणार का ? तसेच हा वाद शमविण्यासाठी काय पावले वरिष्ठ पातळीवर उचलले जाणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here