आष्टा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागणी येथील एका डॉक्टरांना चार दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. तिघांना सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घरात इतर कोणीच नसल्याने घर कुलूपबंद होते. सोमवारी रात्री डॉक्टरांची सांगलीत राहणारी मुलगी प्रियदर्शनी पाटील बागणीतील घराकडे आली असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. आत जाऊन पाहिल्यानंतर लाकडी कपाटामधील साहित्य विस्कटले होते. झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
प्रियदर्शनी संदीप पाटील (वय ४२, रा. विश्रामबाग, सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी कपाटातील ५ तोळ्यांचे मंगळसूत्र, ३ तोळ्यांची दोन लहान मंगळसूत्रे, ५ तोळ्यांचा नेकलेस, ४ तोळ्यांची मोहनमाळ, १२ तोळ्यांची बोरमाळ, बांगड्या, अंगठ्या, कर्णफुले आणि रोख ६० हजार रुपये असा सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. घरातील तिघांना करोनाचा संसर्ग झाल्याने पाटील कुटुंबीय चिंतेत होते. यातच चोरट्यांनी आयुष्यभरातील कमाईवर डल्ला मारल्याने पाटील कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आष्टा पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times