म. टा. प्रतिनिधी, पुणे: करोनामुक्त होऊन घरी गेलेल्या रुग्णांबाबत अनेक समस्या निर्माण होत असल्याने प्रशासनाने ‘पोस्ट कोविड मॅनेजमेंट प्लॅन’ तयार केला आहे. त्याअंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या हद्दीत पाच ठिकाणी समुपदेशनासाठी बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात येणार आहेत. या ‘ओपीडीं’मध्ये प्रत्यक्ष येणे शक्य नसलेल्या करोनामुक्त नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी टोल फ्री क्रमांकांचीही व्यवस्था केली जाणार आहे.

करोनातून बरे होऊन घरी गेलेल्या नागरिकांना विविध प्रकारच्या समस्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राव म्हणाले, ‘पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत चालली आहे. मात्र, त्यांना समुपदेशनाची गरज आहे. त्यासाठी ससून रुग्णालयात एक ‘ओपीडी’ सुरू करण्यात आली आहे. त्याचे स्वरुप बदलण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दोन जम्बो सेंटर, नायडू रुग्णालय आणि बाणेर येथील सेंटरच्या ठिकाणी या ‘ओपीडी’ सुरू केल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी करोनामुक्त झालेल्या नागरिकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांना अन्य उपचाराची गरज भासल्यास व्यवस्था केली जाणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये या ‘ओपीडी’ सुरू होणार आहेत’

‘या ‘ओपीडीं’मध्ये सर्व करोनामुक्त नागरिकांना येता येणार नाही. त्यामुळे करोनामुक्त नागरिकांना घरबसल्या माहिती मिळण्यासाठी टोल फ्री क्रमांकांचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे’ असे राव यांनी स्पष्ट केले.

‘पुणे जिल्ह्यामध्ये सध्या दोन लाख २८ हजार रुग्ण हे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे विभागातील पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांतील सुमारे तीन लाख ३५ हजार रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांना त्रास झाल्यास कोणती व्यवस्था करायची, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पुण्याहून मुंबईत नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे पथक पाठवून माहिती घेण्यात आली. ओरिसामधील कटक विद्यापीठामध्ये पोस्ट कोविड मॅनेजमेंट या विषयावर अभ्यास करण्यात आला आहे. ती माहिती या विद्यापीठाकडून प्राप्त झाली आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या हद्दीत येत्या दोन ते तीन दिवसांत पाच ठिकाणी समुपदेशन करण्यासाठी ‘ओपीडी’ सुरू केल्या जाणार आहेत’ असे राव यांनी सांगितले.

‘करोनामुक्त झाल्यानंतर घरी गेलेल्या रुग्णांपैकी सुमारे दहा ते १२ टक्के रुग्णांमध्ये मानसिकदृष्ट्या प्रश्न निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही रुग्णांना अन्य व्याधी असतात. काहींना करोनावर उपचार करताना देण्यात आलेल्या औषधांचा त्रास होतो. या बाबी विचारात घेऊन ही व्यवस्था सुरू केली जाणार आहे’ असे राव म्हणाले.

‘या ‘ओपीडीं’मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची पथके नेमण्यात येणार आहेत. बरे झालेल्या रुग्णांशी मानवी दृष्टिकोनातून संवाद कसा साधायचा आणि त्यांचे समुपदेश कसे करायचे, याबाबत डॉक्टरांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे’ अशी माहिती राव यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here