म. टा. प्रतिनिधी, पुणेः केंद्र सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी असल्याचे सांगून राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. यांनी नवीन कायद्यांना मंगळवारी कडाडून विरोध केला. ‘केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी, पणन आणि कामगार कायद्याचा विरोध करण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने एक गाव एक ठराव, यापद्धतीने ठराव केला पाहिजे. राज्यात एक लाख ठराव करण्यासाठी पुढाकार घेतला आहे,’ असे देवी यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार धोरणाला विरोध करण्यासाठी डॉ. गणेश देवी यांनी सुरू केलेल्या संवाद यात्रेचे पुण्यामध्ये मंगळवारी आगमन झाले. देवी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी, व्यापारी, कामगार, अडते यांच्या बरोबर संवाद साधला. नंतर राष्ट्र सेवा दलात सभा पार पडली. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख, प्रा. सुभाष वारे, कामगार युनियनचे संतोष नांगरे, लोकायतचे नीरज जैन तसेच यात्रेचे समन्वयक संदेश भंडारे आदी उपस्थित होते.

‘केंद्र सरकारचे धोरण शेतकरी आणि कामगार विरोधी असून त्याचा कडाडून निषेध केला पाहिजे,’ असे सांगून देवी यांनी शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून याबद्दल जागृती करत असल्याचे नमूद केले. राज्यात एक लाख ठराव करून सरकारला जागे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ही यात्रा नाशिककडे रवाना झाली असून गांधी जयंती दिनी, २ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे यात्रेची सांगता होणार आहे.

केंद्र सरकारने कृषी, पणन आणि कामगार कायदा हिताचा असल्याचा अपप्रचार केला आहे. प्रत्यक्षात हे कायदे शेतकरी आणि कामगार विरोधी आहेत. या नवीन धोरणाचा पहिला बळी शेतकरी जाणार असून ग्राहक म्हणून जनता अंतिम बळी असेल.
– डॉ. गणेश देवी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here