नवी दिल्ली, लखनऊ, हाथरसः युपीतील हाथरसमध्ये दलित तरुणीवर निर्भयासारखे क्रूर कृत्य केल्याची घटना उघड झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. सोशल मीडियावरून नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे. दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तरुणीने अखेरचा श्वास घेतला. यानंतर हॉस्पिटल बाहेर आंदोलन केलं गेलं आणि नंतर कँडल मार्च काढण्यात आला. युपीत राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली गेली. तर काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या मौनावर सवाल केला आहे. काँग्रेससह समाजवादी पार्टी, बसपा, आम आदमी पार्टी आणि भीम आर्मीसारख्या संघटना आणि पक्ष भाजप सरकारविरोधात आक्रम झाले आहेत. तर तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि तिची जीभ कापल्याचे आरोप वैद्यकीय अहवालाच्या आधारावर फेटाळून लावले आहेत.

मोदी गप्प का? मनमोहन यांना बांगड्या पाठवणारी नेता मौन का?

पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या महिला नेत्यांवरच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये उत्तर प्रदेश ‘गुन्हेगारांचा गड’ बनला आहे, असा आरोप काँग्रेसने केलाय. पीडितेला त्वरित न्याय मिळाला पाहिजे. तसंच ही घटना फेक असल्याचं सांगितल्याबद्दल भाजप सरकारने माफी मागितली पाहिजे, असं काँग्रेसने म्हटलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध केला आहे. तसंच पीडितेला जलद गती न्यायालयाद्वारे तातडीने न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलीय.

पंतप्रधान मोदी गप्प का?

गुजरातमधील काँग्रेसने अर्जुन मोढवाडिया यांनी २०१२ चे पंतप्रधान मोदींचे जुने ट्विट रिट्विट केले आहे. तसंच मोदी गप्प का? असा सवाल केला आहे. हाथरसमधील ज्या तरुणीचा मृत्यू झाला तीही भारताची कन्या होती. निर्भयाच्या वेळी तुम्ही बोललात. पण आज कुठलाच आक्रोश का नाही? मुख्यमंत्री योगी गप्प का? स्मृती इराणी गप्प का? असा सवाल त्यांनी केला आहे.

स्मृती इराणींची जुनी वक्तव्य व्हायरल

काँग्रेसने स्मृती इराणी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर त्यांचे जुने व्हिडिओ व्हायरल होत आहे. विरोधात असताना इराणींनी महिलांवरील अत्याचारांवरून आवाज उठवला होता. आता युजर्स तेच व्हिडिओ शेअर करत इराणी गप्पा का? असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून पीडितेला लवकर न्याय द्यावा. गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा करावी, अशी मागणी बसपा नेत्या मायावतींनी केलीय. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीही पीडितेला न्याय देण्याची मागणी केलीय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here