अभिजित बबन मासाळकर (वय ३६, रा. जातेगाव खुर्द, ता. शिरूर) यांनी या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मासाळकर यांचा शेल पिंपळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गाळा आहे. ते कांद्याचे व्यापारी आहेत. त्यांच्या गाळ्यात तयार केलेल्या कांदा चाळीतून अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार ६०० रुपयांच्या कांद्याच्या ४१ गोण्या चोरून नेल्या आहेत. हा प्रकार शुक्रवारी (२५ सप्टेंबर) रात्री नऊ ते शनिवारी (२६ सप्टेंबर) सकाळी सात या कालावधीत घडला आहे.
कांद्याला सध्या मोठी मागणी असून अद्याप नवीन कांदा मार्केटमध्ये आलेला नाही. त्यामुळे जुन्या कांद्याचा भाव वधारला आहे. किरकोळ बाजारात कांदा ५० रुपये किलोने विकला जात आहे; तर ठोक बाजारात कांद्याचे भाव ३० ते ४० रुपये किलो आहेत. कांदा महाग झाल्याने चोरट्यांकडून आता कांदा चोरीचे प्रकार वाढले आहेत. चाकण पोलिस तपास करीत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times