कोल्हापूर: पुणे विभागीय पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादी विरोधात भाजप अशी जोरदार लढत होण्याची चिन्हे आहेत. हे दोन्ही पक्ष उमेदवारी कोल्हापूर, सांगलीला देणार की पुण्याला हे पंधरा दिवसात निश्चित होणार आहे. काटाजोड लढतीची अपेक्षा असल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावत पक्षीय नेत्यांशी संपर्क वाढवला आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

विधानपरिषदेच्या पुणे विभागीय पदवीधर मतदार संघाची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोन वर्षे अनेकजण या निवडणुकीची तयारी करत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी अशीच लढत होण्याची शक्यता असल्याने या दोन पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटील यांना भाजपची हॅट्रिक करायची आहे, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अरूण लाड यांच्या रूपाने सांगली जिल्हयात आणखी एक आमदार वाढवायचा आहे. यामुळे या दोघांची प्रतिष्ठाच पणाला लागणार आहे.

वाचा:

प्रकाश जावडेकर व चंद्रकांत पाटील यांनी या मतदार संघावर पाचवेळा भाजपचा झेंडा लावला. यामुळे येथे भाजपचा वरचष्मा आहे. म्हणून भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील कोथरूड मधून विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या वारसदाराला निवडून आणण्याची जबाबदारी त्यांची राहणार आहे. सध्या राजेश पांडे यांचे नाव आघाडीवर आहे. वीस वर्षे या मतदारसंघाची तयारी करणारे कोल्हापूरचे माणिक पाटील चुयेकर यांचे त्यांना आव्हान राहणार आहे. सोलापूरचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. सातारा येथील शेखर चरेगावकर यांचेही नाव अलिकडे चर्चेत आले आहे. सहापैकी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते याचीच उत्सुकता आहे. ज्याला उमेदवारी मिळणार नाही, तो बंडखोरी करण्याची शक्यता फार कमी आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढवताना जागा मात्र राष्ट्रवादीला मिळणार हे निश्चित आहे. राष्ट्रवादीलाच जागा जाणार हे गृहित धरून काँग्रेसच्या एकाही नेत्याने तयारीच केली नाही. उमेदवारीसाठी लाड यांचे नाव आघाडीवर आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करत ३७ हजारांवर मते मिळवली होती. गतवेळचे पक्षाचे उमेदवार सारंग पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने लाड यांचा मार्ग मोकळा झाला आहे. तरीही त्यांना उमेदवारीसाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भूमिकेवरच त्यांची उमेदवारी अवलंबून राहणार आहे.

राष्ट्रवादीकडून पक्षाचे राज्य सरचिटणीस उमेश पाटील इच्छूक आहेत. ते राज्य पदवीधर संघटनेचे अध्यक्ष आहेत. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे सुपूत्र बाळराजे पाटील यांनी देखील बरीच तयारी केली आहे. नंदादीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या नीता ढमाले या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितली आहे. इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे हेदेखील घड्याळ चिन्हावर लढण्यासाठी इच्छूक आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक प्रताप माने यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

या दोन पक्षाव्यतिरिक्त संभाजी ब्रिगेडचे मनोज गायकवाड , प्रविण कोडोलीकर यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या दोन उमेदवारांना टक्कर देणारे इतर काही उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे.

पदवीधर मतदारसंघ इच्छुक
भाजप – राजेश पांडे, शेखर चरेगावकर, माणिक पाटील चुयेकर, रोहन देशमुख, सचीन पटवर्धन, प्रसन्नजित फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेस – अरूण लाड, नीता ढमाले, उमेश पाटील, बाळराजे पाटील, श्रीमंत कोकाटे, प्रताप माने

इतर – प्रविण कोडोलीकर, मनोज गायकवाड, भरत रसाळे

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here