अहमदनगर: आक्रमक आंदोलन म्हणजे ‘खळ्ळखट्याक॒’. मात्र, याचा संबंध केवळ महाराष्ट्र नव निर्माण सेनेशी जोडला गेलेला आहे. मनसेने हा इशारा दिला की यंत्रणा झुकल्याची उदाहरणे आहेत. म्हणूनच की काय महात्मा गांधीचा वारसा सांगणाऱ्या काँग्रेसनेही आता हाच मार्ग अवलंबण्याचा इशारा नगर शहरात दिला आहे. नव्याने शहरजिल्हाध्यक्ष झालेले किरण काळे यांनी महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजप- राष्ट्रवादीला हा इशारा दिला आहे.

शहरातील फेरीवाल्यांच्या विषयावर काँग्रसने ही आक्रमकता दाखविली आहे. शहरातली गोरगरिबांची पिळवणूक थांबवत शहरातील रस्त्यांचा श्‍वास मोकळा करण्यासाठी मनपा सत्ताधारी आणि प्रशासनाने नगर शहरासाठी तात्काळ हॉकर्स धोरण तयार करायला घ्यावे. शहरातील वाहतूक आणि गोरगरीब व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडण्यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत कारवाई सुरू न केल्यास आक्रमक होत मनपात खळ्ळखट्याक॒ करेल, असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष काळे यांनी दिला आहे.

महापालिकेकडून शहरातील फेरीवाले, हातगाडीवाले, टपरीवाले, भाजीविक्रेते यांची अमानुष पद्धतीने पिळवणूक सुरू आहे. रस्त्यांच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत शहरातील हॉकर्स झोन जाहीर होऊन त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत या शहराची दैना संपणार नाही. तात्काळ हॉकर्स झोन घोषित करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड आदी मनपांनी काम केले आहे. नगरची मनपा मात्र गाढ झोपलेली आहे. सन २००७-२००८ मध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरण आले होते. त्यावेळी नगर मनपाने सर्व्हेक्षण करून शहरातील फेरीवाल्यांची संख्या नोंदणी करून घ्यायची होती. तसेच यासाठीच्या समितीची स्थापना करायची होती. त्या माध्यमातून धोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणी करायची होती. परंतु त्यामध्ये काहीच काम केले गेले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. गोरगरिबांच्या मालाची नुकसानी होत असते. जप्तीची कारवाई करत असताना मोठा दंड आकारला जातो. मुळात ही कारवाईच बेकायदेशीर स्वरूपाची असल्याची असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपची सत्ता आहे, तर शिवसेना विरोधात आहे. काळे पूर्वी राष्ट्रवादीत होते. अलीकडेच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना शहर जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. ते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे समर्थक समजले जातात. त्यांनी अनेक उपक्रम राबवून शहरात काँग्रेसला सक्रीय करण्याचा प्रयत्न केला. काही प्रश्न मार्गीही लावले. मात्र, आता थेट काँग्रेसच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मनसेच्या पद्धतीने खळखट्याकचा इशारा दिल्याने काळे चर्चेत आले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here