मिळालेल्या माहितीनुसार, छबुताई डांगे या तुंग येथे त्यांच्या मुलासोबत राहात होत्या. त्यांच्या मुलाची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी २०१६ मध्ये तुंग येथील दोघा खासगी सावकारांकडून व्याजाने ४ लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या मोबदल्यात राहुल डांगे, सचिन डांगे या सावकारांनी पैशांच्या व्याजापोटी छबुताई यांची ४ एकर जमीन कसण्यासाठी ३ वर्षे कराराने घेतली होती. दरम्यानच्या काळात २०१७ मध्ये छबुताई यांच्या मुलाचे उपचारादरम्यान निधन झाले. इतर कोणाचाही आधार नसल्याने त्या मुलीकडे इस्लामपूर येथे राहायला गेल्या. खासगी सावकारांचे कर्ज आणि व्याज कसे फेडायचे असा प्रश्न छबुताई यांना पडला होता.
त्याचवेळी डांगे बंधूंनी ३ वर्षांचा शेतीचा करार संपूनही छबुताई यांना जमीन परत दिली नाही. उलट जोपर्यंत आमचे ४ लाख २० हजार रुपये आणि व्याज मिळत नाही, तोपर्यंत जमीन आमच्याकडेच राहील अशा शब्दांत दमदाटी केली. २०१६ ते मार्च २०२० या कालावधीमध्ये सावकार डांगे बंधूंनी छबुताई वास्तव्यास असलेल्या त्यांच्या इस्लामपूर येथील मुलीच्या घरी जाऊन त्यांना पैशांसाठी तगादा लावला होता. मार्च २०२० मध्ये सावकारांनी छबुताईंच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केली. गेल्या सहा महिन्यांपासून त्या खाजगी सावकारांच्या भीतीपोटी बाहेर पडल्या नाहीत. अखेर त्यांनी मंगळवारी रात्री सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात सावकारांविरोधात फिर्याद दिली. छबुताई यांच्या फिर्यादीवरून तुंग येथील सावकार राहुल डांगे आणि सचिन डांगे यांच्या विरोधात मारहाण व खासगी सावकारी अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला. सावकारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आणखी बातम्या वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times