म.टा.प्रतिनिधी, नगरः नगर शहरातील खड्ड्यांची समस्या सोडवण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे हे एकत्र दिसले. या दोघांनीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह सावेडी उपनगरातील गंगा उद्यान रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली. तसेच हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून नगरमध्ये मागील आठवड्यात राजकारण चांगलेच तापले होते. नगर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपला कोंडीत पकडण्याची संधी यानिमित्ताने विरोधकांना मिळाली, व खड्डयांच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष आमने-सामने आले होते. मात्र, आता दुसरीकडे हा खड्ड्यांचा प्रश्न सुटावा, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनीही महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासोबत रस्त्यांची पाहणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय ढोणे, माजी नगरसेवक अजिंक्‍य बोरकर, अमोल गाडे, अमित खामकर, घनकचरा विभाग प्रमुख डॉ. नरसिंग पैठणकर, विद्युत विभाग प्रमुख राजेंद्र मेहेत्रे, अभिजीत चिप्‍पा, पुष्‍कर कुलकर्णी, गोरख पडोळे, आदी उपस्थित होते.

वाचाः

‘मागील आठवडयामध्‍ये नगर शहरातील विविध प्रश्‍ना संदर्भात अधिकारी, इंजिनिअर, विभाग प्रमुख, आदीसह सुमारे सात तास बैठकीमध्‍ये विविध प्रश्‍नावर चर्चा करून उपाय योजना करण्‍याचे आदेश देण्‍यात आले. या पार्श्‍वभूमीवर शहरामध्‍ये विविध ठिकाणी रस्‍त्‍यावरील साफ सफाई रस्‍त्‍याच्‍या कडेने असलेले दगड गोटे, गवत साफ सफाई करण्‍याच्‍या कामास सुरूवात झाली. तसेच पाऊस उघडल्‍यानंतर लगेच महानगरपालिका हद्दीतील रस्‍त्‍यावरील पडलेल्‍या खड्डयाचे मजबुतीकरण व खडीकरण करण्‍याचे काम हाती घेण्‍यात येणार आहे.

वाचाः

यापुढील काळात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. प्रत्‍येकाने आपआपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी,’ असे यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. तर, महापौर वाकळे म्‍हणाले की, ‘नगर शहरामध्‍ये पावसामुळे रस्‍त्‍यावर खड्डे पडले आहेत. या खड्डयामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. परंतु पावसामध्‍ये डांबराने खड्डे बुजविण्‍याचे काम हाती घेता येत नाही. आता पाऊस उघडला आहे. नगर शहरातील सर्व खड्डे बुजविण्‍याचे काम हाती घेणार आहे. नगर शहरातून महामार्ग व राज्‍यमहामार्गाचे रस्‍ते जात असून यावरही मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. ते बुजविण्‍याचे काम बांधकाम विभाग लवकरच सुरू करणार आहे.’

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here