नवी दिल्लीः भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी हाथरस सामूहिक बलात्काराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. आपण थोडासा धीर धरला पाहिजे. योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या राज्यात कार कधीही पलटी होते. कैलास विजयवर्गीय यांचा इशारा गँगस्टर विकास दुबे याच्या एन्काउंटरकडे होता. विकास दुबेला उज्जैनहून कानपूरला नेण्यात येत असताना असताना पोलिसांची गाडी पलटी झाल्याची घटना घडली होती.

हाथरस बालात्काराच्या घटनेबद्दल कैलास विजयवर्गीयांना पत्रकारांनी प्रश्न केला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं. आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाकडे जात आहे. धीर धरला पाहिजे. आरोपी तुरुंगात जातील. कारण योगी आदित्यनाथ हे युपीचे मुख्यमंत्री आहेत. आणि त्यांच्या राज्यात कधीही कार पलटी होते, असं वक्तव्य विजयवर्गीय यांनी केलं.

हाथरस येथे दलित तरुणीवर १४ सप्टेंबरला सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या पीडितेवर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू होते. तिचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. संदीप, रामू, लवकुश आणि रवी अशी आरोपींची नावं आहेत. तरुणी आरोपींना विरोध केल्यानंतर तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करत गळा दाबला. पीडितेची जीभही कापण्यात आली होती, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तिच्या पाठीचा कणाही मोडला होता, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

दुसरीकडे या घटनेवरून वाढता रोष आणि विरोधकांचा दबावाच्या पार्श्वभूमीवर युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज पीडित कुटुंबाशी बोलले. आरोपींवर कठोर कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दरम्यान, हाथरस प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. सीएम आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय एसआयटीची टीम या प्रकरणाची चौकशी करेल. एसआयटीमध्ये दलित आणि महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here