नवी दिल्लीः सोन्याचे दागिने विकणाऱ्या विक्रेत्यांना आता यापुढे दागिने विकताना हॉलमार्क असलेले दागिनेच विकावे लागणार आहे. जर विक्रेत्यांनी हा नियम पाळला नाही तर त्यांना दंड भरावा लागेल तसेच एका वर्षाची शिक्षा भोगावी लागू शकते. विक्रेत्यांना १५ जानेवारी २०२१ पासून केवळ १४, १८ आणि २२ कॅरेटच्या दागिन्यांचा हॉलमार्क असलेल्या वस्तू विकता येणार आहेत. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ही माहिती दिली आहे.

भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) मध्ये नाव नोंदणी करण्यासाठी आणि हॉलमार्किंगची व्यवस्था करण्यासाठी विक्रेत्यांना एका वर्षाची मुदत दिली आहे. या नियमांची अधिसूचना १६ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार आहे. यात १५ जानेवारी २०२१ पासून सोन्यांच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक असणार आहे. गोल्डमार्किंग करणे सध्या बंधनकारक नाही. काही दुकानदार करतात तर काही करीत नाही. परंतु, यापुढे सर्व व्यापाऱ्यांना हे बंधनकारक करावे लागणार आहे. बीआयएस एप्रिल २००० पासून सोन्यांच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग असावे यासाठी प्रयत्न करीत आहे. सध्या जवळपास ४० टक्के सोन्यांच्या दागिण्यांवर हॉलमार्किंग केली जात आहे.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी या विषयी माहिती देताना सांगितले की, या नियमाची १५ जानेवारी २०२१ पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अंमलबजावणी करण्यासाठी व्यापाऱ्यांना वर्षभराची मुदत दिली आहे. त्यामुळे सोन्याच्या व्यापाऱ्यांना यापुढे १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दागिने विकण्याची परवानगी असणार आहे. आता हॉलमार्किंग दहा कॅटेगरीत केली जाते. पंरतु, यानंतर हॉलमार्किंग केवळ तीन कॅटेगरीत म्हणजेच १४ कॅरेट, १८ कॅरेट आणि २२ कॅरेटमध्ये उपलब्ध असणार आहे. देशभरात सध्या २४३ जिल्ह्यातील ८९२ हॉलमार्किंग केंद्र आहेत. तसेच २८ हजार ८४९ दागिन्यांच्या विक्रेत्यांनी बीआयएसकडे नोंदणी केलेली आहे. यापुढे सर्व जिल्ह्यात हॉलमार्किंग केंद्र उघडणे आणि एक वर्षापर्यंत सर्व दागिने विक्रेत्यांना त्यात नोंदणी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी जनजागृती अभियान सुरू केले जाणार असल्याचेही पासवान यावेळी म्हणाले.

एक लाख रुपयांपर्यंत दंड

हॉलमार्किंग न करता दागिण्यांची विक्री केल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे. किंवा विक्री केलेल्या दागिण्यांच्या पाचपट दंड आकारला जाऊ शकतो. तसेच व्यापाऱ्याला एका वर्षाची शिक्षा होऊ शकते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here