महामार्गावरील येथील धुंदलवाडीतील हॉटेल आकाशमध्ये बुधवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास ३ दरोडेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार केला. त्याचवेळी हॉटेल मालक आणि काही कामगारांनी विरोध केला. दरोडेखोरांनी त्यांच्यावरही तीन गोळ्या झाडल्या. यात कुणीही जखमी झाले नाही. मात्र, गोळीबार करून लुटमार करणारे फरार झाले. घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक व कासा आणि तलासरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. लवकरच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरोडेखोर आधीही हॉटेलात आले होते…
बुधवारी ३० सप्टेंबरला रात्री तीन जण कारमधून हॉटेलात आले होते. पाहणी करून ते निघून गेले होते. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री हॉटेलात येऊन त्यांनी कॅशिअरजवळील पैसे लुटले. पैसे लुटून पसार होत असताना मालक आणि काही कामगारांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही.
कार तिथेच ठेवून केले पलायन
मालक आणि काही कामगारांनी दरोडेखोरांना विरोध केला. त्यामुळे दरोडेखोरांनी पळ काढला. कारची चावी काढून घेतल्याने दरोडेखोरांना कार तेथेच ठेवून पलायन करावे लागले. या दरोडेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेनंतर महामार्गावरील हॉटेलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर काही हॉटेल रात्रभर सुरू असतात. मात्र, अनेक हॉटेलांतील सीसीटीव्ही कॅमरे बंद असल्याचे दिसून येते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times