म. टा. प्रतिनिधी, सांगलीः वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथे तलावात बुडून पाच वर्षीय जुळ्या बहिणींचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. १) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. विद्या विजय बर्गे आणि वेदिका विजय बर्गे अशी मृत मुलींची नावे आहेत. खेळता-खेळता दोघी तलावाकडे गेल्या होत्या. एकमेकींना घट्ट पकडलेल्या स्थितीत त्यांचे मृतदेह पाण्यात आढळले. या घटनेची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विजय बर्गे हे शेतमजूर आहेत. पत्नी व दोन जुळ्या मुलींसह ते ऐतवडे खुर्द येथे राहतात. गुरुवारी सकाळी त्यांनी बिरोबा मंदिर परिसरात भुईमुगाच्या शेंगा वाळवण्यासाठी उन्हात घातल्या होत्या. वडिलांसोबत त्यांच्या दोन्ही मुलीदेखील मंदिर परिसरात गेल्या होत्या. मंदिरापासून जवळच तलाव आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास विद्या आणि वेदिका खेळता खेळता तलावाकडे गेल्या. बराच वेळ त्या आई-वडिलांना दिसल्या नाहीत. मंदिराकडे परतल्या नसल्याने आई-वडिलांनी शोधाशोध सुरू केली. गावातील तरुणांनीही मुलींचा शोध घेतला. काही तरुणांना तलावाच्या बाजुला चिखलात लहान मुलांच्या पायाचे ठसे दिसले. मुली पाण्यात बुडाल्याच्या संशयावरून शोध सुरू केला असता, दोघींचे मृतदेह पाण्यास आढळले. बुडल्यानंतर दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली होती. याच स्थितीत त्या पाण्यात सापडल्या. सायंकाळी सात वाजता त्या दोघींचे मृतदेह गावातील लोकांनी बाहेर काढून कुरळप येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले. घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अरविंद काटे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात झाली असून, रात्री उशिरा दोन्ही मुलींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here