मकर संक्रातीचा सण भारतासह बांग्लादेश, श्रीलंका आणि नेपाळ या देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण भारतातील विविध राज्यात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. पंजाबमध्ये लोहिरी, आसाममध्ये भोगली बिहू, आंध्र प्रदेश व तामिळनाडूत पोंगल आणि गुजारमध्ये उत्तरायण अशी या सणांची नावे आहेत. सणांच्या नावाप्रमाणेच संक्रांत साजरी करण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. यानिमित्ताने त्या त्या राज्यात विशेष पदार्थ तयार केले जातात. या स्पेशल डिशेसवर टाकलेला दृष्टिक्षेप…

गजक, मध्य प्रदेश

उत्तर भारतात आणि खासकरून मध्य प्रदेशात मकर संक्रातीच्या दिवशी ‘गजक’ हा पदार्थ बनवला जातो. भाजलेल्या तिळात तुप, साखर, ड्रायफ्रुट्सचे तुकडे वापरून स्वादिष्ट गजक बनवले जाते.

दहीचुरा, बिहार

बिहार आणि झारखंडमध्ये संक्रांतीच्या दिवशी ‘दहीचुरा’ खाण्याची पद्धत आहे. दही आणि साखर एकत्रित करून दहिचुरा बनवला जातो. यादिवशी चिवडा आणि पोहे दहीचुऱ्यासोबत खाण्याची प्रथा आहे.

खिचडी, उत्तर प्रदेश

मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तर प्रदेशासह अनेक राज्यात उडीद डाळीची खिचडी खाण्याची प्रथा आहे. उत्तर प्रदेशात हा सण ‘खिचडी पर्व’ या नावाने ओळखला जातो. तांदूळ आणि डाळींसह आवडीच्या भाज्यांची खिचडी बनवली जाते.

अप्पालू, आंध्र प्रदेश आणि तेलंगण

आंध्र प्रदेशात आणि तेलंगणमध्ये खास संक्रांतीच्या दिवशी बनवले जाणारा ‘अप्पालू’ हा गोड पदार्थ आहे. गहू आणि तांदळाचे पीठ गुळाच्या पाण्यात मळून तयार होणाऱ्या कणकेला मोदकाच्या आकारात खमंग तळल्यानंतर कुरकुरीत अप्पालू तयार होतात.

गुळपोळी, महाराष्ट्र

मकर संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रात ‘गुळपोळी’ तयार केली जाते. गुळामध्ये तीळ, खसखस, किसलेले खोबरे भाजून तयार होणारे मिश्रण कणकेत भरून ती पोळी व्यवस्थित भाजल्यानंतर गुळपोळी तयार होते.

पश्चिम बंगालचे पीठे पायेश पुली

पश्चिम बंगालमध्ये संक्रांतीला ‘पीठे पायेश पुली’ या नावाचा अगळावेगळा पारंपरिक पदार्थ बनवण्यात येतो. तांदळाच्या पिठापासून बनणारा अंबोळीसारखा पदार्थ म्हणजे पीठे होय. पीठामध्ये नारळ किसून त्याची सुरळी केली जाते. यानंतर दूध, गूळ आणि तांदूळ एकत्र उकळ्यानंतर जी खीर बनते, तिच्यासोबत पीठे खाल्ले जातात. एकत्रितपणे या पदार्थाला पीठे पायेश पुली असे म्हणतात.

खन्डोह, आसाम
आसाममध्ये संक्रांतीला ‘बिहू’ या नावाने ओळखले जाते. या दिवसात ‘खन्डोह’ नावाचा विशेष पदार्थ बनवला जातो. तांदूळ तळून घेतल्यानंतर त्यात दही, गूळ आणि दुधाचे एकत्रित मिश्रण केल्यानंतर खन्डोह खाण्यासाठी तयार होतो. आसामी लोक हा पदार्थ सकाळी नाष्ट्याच्या वेळी खाणे जास्त पसंद करतात.

ऊसाची खीर, पंजाब

पंजाबमध्ये ‘बैसाखी’ या नावाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवशी पंजाबमध्ये ‘ऊसाची खीर’ बनवली जाते. ऊसाच्या खिरीत भाजून टाकलेले ड्रायफ्रुट्स खिरीची चव आणखी वाढवतात.

मकरा चौला, ओडिशा

संक्रांतीच्या दिवशी ओडिशामध्ये ‘मकरा चौला’ हा पदार्थ बनवण्यात येतो. तांदळाच्या पिठात किसलेला नारळ, दूध, ऊसाचे बारीक तुकडे, पिकलेली केळी, साखर, पनीर, आलं आणि डाळींब टाकून मकरा चौला बनवला जातो. मकरा चौला हा संक्रातीच्या दिवशी देवासाठी प्रसाद म्हणून बनवला जातो. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर मकरा चौला सर्वांना दिला जातो.

उंदियो, गुजरात

‘उंदियो’ ही गुजरातची खास डिश आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी हा पदार्थ बनवला जातो. हंगामी भाज्या, कच्ची केळी, वांगी हे सर्व एकत्रित करून बनणाऱ्या या भाजीला बाजरीची भाकरी किंवा पुरीसोबत खाल्ले जाते.

घुघुतीया, उत्तराखंड

उत्तराखंडमध्ये संक्रांतीच्या दिवशी ‘घुघुतीया’ नावाचा पदार्थ बनवले जाते. गूळ आणि गव्हाचे पीठ एकत्र मळल्यानंतर चाकू, भाला, डाळिंबाचे फुल, अशा विविध आकारातील घुघुतीया तुपात तळल्या जातात. त्यापासून बनणारा हार लहान मुलांच्या गळ्यात घालण्यात येतो. यानंतर ही मिठाई पक्षांना खाऊ घातली जाते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

1 COMMENT

  1. Hi, just required you to know I he added your site to my Google bookmarks due to your layout. But seriously, I believe your internet site has 1 in the freshest theme I??ve came across. Click on the Keyword to Enter the Website. Bahsegel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here