फाशीपासून बचाव करण्यासाठी क्युरेटिव्ह पिटीशनची अखेरची खेळीही संपली, तेव्हा निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याने आता दयेचा अर्ज केला आहे. मंगळवारी त्याने तुरुंगातून राष्ट्रपतींना दयेचा अर्ज केला. तत्पूर्वी त्याची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या प्रकरणातील सर्व चार दोषींना २२ जानेवारी रोजी पहाटे ७ वाजता फाशी दिली जाणार आहे.
मुकेश याच्या आधी या प्रकरणातील अन्य आरोपी विनय शर्मा यानेही राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. पण नंतर त्याने तो मागे घेण्याची मागणी केली होती. अन्य दोन दोषी अक्षय कुमार सिंह आणि पवन गुप्ता यांनी अद्याप पुनर्विचार याचिका दाखल केलेली नाही.
राष्ट्रपती राज्यघटनेतील अनुच्छेद -७२ आणि राज्यपाल अनुच्छेद -१६१ नुसार दया याचिकेवर सुनावणी घेऊ शकतात. याच दरम्यान राष्ट्रपती गृहमंत्रालयाकडून अहवाल मागवतात. मंत्रालयाकडून राष्ट्रपतींना शिफारस पाठवली जाते आणि त्यानंतर राष्ट्रपती दया याचिका निकाली काढतात. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळून लावली तर गुन्हेगारांच्या फाशीचा मार्ग मोकळा होतो. दया याचिका निकाली काढण्यात अकारण विलंब झाला तर त्याआधारे गुन्हेगार पुन्हा सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करू शकतो.
काय घडलं होतं?
दक्षिण दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी रात्री चालत्या बसमध्ये २३ वर्षांची विद्यार्थिनी निर्भयावर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. तिला त्यांनी अत्यंन क्रूरपणे जखमी करत त्याच अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले होते. तिच्यावर सिंगापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यादरम्यान २९ डिसेंबर २०१२ रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. निर्भयाच्या न्यायासाठी देशात विविध ठिकाणी आंदोलने, निषेध मोर्चे निघाले होते.
मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. अन्य एक अल्पवयीन आरोपीवर बालन्यायालयांतर्गत कारवाई झाली. त्याला तीन वर्षं बालसुधारगृहात ठेवण्यात आले. अन्य चौघांच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायलयाने शिक्कामोर्तब केले. त्यांच्या पुनर्विचार याचिकाही फेटाळण्यात आल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times