म. टा. प्रतिनिधी, नगर: तालुक्यातील पठारवाडी येथील घोडोबा देवस्थान मंदिराजवळील शंभर वर्षांहून अधिक जुने कडुलिंबाचे झाड तोडणाऱ्याला एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय पावसाळ्यात विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करून ती मोठी होईपर्यंत त्यांची देखभाल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पारनेरचे वृक्ष अधिकारी तथा वन अधिकारी एस. व्ही. गोरे यांनी हा आदेश दिला.

शहरी भागात महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत अधिनियम १९६४ ची बऱ्यापैकी अमंलबजावणी होते. ग्रामीण भागात मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, पाठपुरावा केला तर शिक्षा होऊ शकते, हे या घटनेतून दिसून आले आहे. पठारवाडी येथील घोडाबा मंदिरासमोर मोठे कडुलिंबाचे झाड होते. ते तेथील काही लोकांनी कापले. याची तक्रार परिसरात राहणारे रामदास घावटे यांनी वन अधिकारी व पारनेरच्या तहसीलदारांकडे केली होती. तहसीलदारांच्या आदेशानंतर वन अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या संतोष बबन काळे यांनी झाड तोडल्याची कबुली दिली.

मंदिरात येणाऱ्या भाविकांना अडचण होते व फांद्या तुटून पडण्याचा धोका असल्याने झाड तोडल्याची कबुली काळे यांनी दिली होती. मात्र, यासाठी रितसर परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे काळे यांच्याविरोधात वृक्षतोड बेकायदा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर वन अधिकारी गोरे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यामध्ये काळे यांना दोषी ठरवून एक हजार रुपये दंड करण्यात आला. तसेच पावसाळ्यात वृक्ष लागवड करून जतन करण्याबाबत शपथपत्र सादर करण्याचा आदेश देण्यात आला. या प्रकरणी लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे यांनी पाठपुरावा केला होता.

आणखी बातम्या वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here