संपूर्ण भारतीय बनावटीच्या इंडस अॅपबझार या अॅप स्टोअरने त्यांच्या ६० लाख यूजरमधील सर्वांत लोकप्रिय अॅपची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, तुलनेने वापरायला सोपी असणारी हेलो, शेअरचॅट आणि लाइकीसारखे अॅप स्मार्टफोनधारकांना सर्वाधिक पसंत असल्याचे दिसून आले आहे.
सोशल मीडिया आणि ई-शेअरिंग अॅपमध्ये पुढील अॅपचा दबदबा आहे.
हेलो : जगभरातील ५० लाख मोबाइलधारक वापरत असलेल्या या अॅपचा अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, सौदी अरेबिया, यूएई, ओमान, कुवेत, कतार, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांमधील १४ विविध भाषांमध्ये वापर केला जातो. संपूर्ण भारतीय बनावटीच्या या अॅपमध्ये चॅटिंग, व्हिडियो शेअरिंगसारख्या सुविधा आहेत.
शेअर चॅट : गेल्या वर्षभरात शेअरचॅट अॅपवरून हिंदी भाषेतील तब्बल दहा कोटी यूजर जनरेटेड कंटेंट अर्थात, वापरकर्त्यांनी तयार केलेले व्हिडीयो, फोटो शेअर करण्यात आले आहेत. यावरूनच या अॅपची लोकप्रियता लक्षात येते.
क्सेंडर : याखेरीज क्सेंडरसारख्या अॅप्सनाही मोबाइलधारक मोठ्या प्रमाणात पसंती देतात. या अॅपवरून वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकारच्या फाइल्स इंटरनेट व वायफायविना एका मोबाइलवरून दुसऱ्या मोबाइलवर पाठवता येतात.
मोबाइल गेम्स : क्युरेकासारखे कोडी घालणारे अॅप असो, अथवा लहानपणी जमिनीवर बसून खेळलेला ल्यूडो या खेळाचे मोबाइल व्हर्जन असो, या गेम्सना मोबाइलधारकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे.
ऑनलाइन खरेदीकडे कल
विमानाची ऑनलाइन तिकीटे, हॉटेल बुकिंग, सुट्ट्यांची पॅकेजेस यात व्यवसाय करणाऱ्या क्लीअरट्रिप या अॅपने गेल्या वर्षी जगभरात १.५ अब्ज अमेरिकी डॉलरची उलाढाल केली आहे. या व्यतिरिक्त लाइकी अॅपच्या नावावर वेगळ्या विक्रमाची नोंद झाली आहे. भारतीय नागरिक तिरंगा फडकावत असतानाच्या व्हिडीओ अल्बमने गीनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान पटकावले असून २२.५३ कोटी मोबाइलधारकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. याखेरीज टाटा क्लिक, ओव्हन स्टोरी, एमपॉकेट, ऑपेरा न्यूज आणि ट्रू कॉलर या अॅप्सनाही नेटकऱ्यांनी जोरदार पसंती दिली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times