उमा भारती यांनी उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणी एकामागून एक ट्विट केलं आहे. एसआयटी तपासादरम्यान पीडित कुटुंब कुणालाही भेटू शकत नाही, असा कोणताही नियम नाही. असं केल्यास एसआयटीचा तपासावर संशय घेतला जाईल. करोनामुक्त झाल्यावर लवकरच हाथरस गाठून पीडित कुटुंबाला भेटणार आहे, असं उमा भारती यांनी सांगितलं. करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर उमा भारती यांच्यावर ऋषिकेशमधील एम्समध्ये उपचार सुरू आहेत.
उमा भारती यांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संबोधून ट्विट केलं. ‘मी हाथरच्या घटनेबद्दल पाहिलं. तुम्ही या प्रकरणी योग्य कारवाई करणार. यामुळे या प्रकरणी बोलू नये असा आधी विचार केला. पण पोलिसांनी ज्या पद्धतीने गावाला आणि पीडितेच्या कुटुंबाला वेढा घातला आहे, यावरून अनेक तर्क लावले जाऊ शकतात. ती एका दलित कुटुंबातील मुलगी होती. पोलिसांनी घाईघाईने तिच्यावर अंत्यसंस्कार केले आणि आता पीडितेच्या कुटुंबाला आणि गावालाच पोलिसांनी वेढा घातला आहे, असं म्हणत पोलिसांनी योगी सरकारच्या कारवाईवर बोट ठेवलं आहे.
नेते आणि माध्यमांना पीडितेच्या घरी आणि गावात जाऊ न देण्याच्या मुद्द्यावरही उमा भारतील बोलल्या. ‘एसआयटी तपासणीदरम्यान कुटुंब कुणालाही भेटू शकणार नाही, असा कोणताही नियम नाही. यामुळे एसआयटीचा तपास संशयाच्या भोवऱ्यात येईल, असा इशारा उमा भारतींनी दिला.
पोलिसांच्या संशयास्पद कृतीने त्यांच्या आणि पक्षाच्या प्रतिमेला झळ बसली आहे, असं उमा भाजप योगी आदित्यनाथ यांना म्हणाल्या आहेत. ‘आपण नुकतीच राम मंदिराची पायाभरणी केली आहे आणि राज्यात रामराज्य आणण्याचा दावा केला आहे. पण या घटनेबाबत पोलिसांच्या संशयास्पद कारवाईने तुमचे सरकार आणि भाजपाच्या प्रतिमेला झळ बसली आहे. तुम्ही अगदी स्वच्छ प्रतिमेचे नेते आहात. यामुळे मीडियाच्या प्रतिनिधींना आणि इतर राजकीय पक्षांना पीडितेच्या कुटुंबाला भेटू द्या, असं आपल्याला आवाहन करते, असं उमा भारती म्हणाल्या आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री निरंजन ज्योती यांचे मोठे विधान
हाथरस प्रकरणावरून युपी सरकार आणि जिल्हा प्रशासनावर चौफेर हल्ले होत आहेत. विरोधी पक्ष आणि संघटनांनी आवाज उठवला असताना आता एनडीए आणि भाजपमधूनही सूर टीकेचे उमटू लागले आहेत.
भाजपच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनीही हाथरस प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. “हे योग्य झालेलं नाही. पीडितेचा मृतदेह कुटुंबाकडे सोपवायला पाहिजे होता, असं ज्योती म्हणाल्या. याशिवाय केंद्रीय मंत्री रामदास आठवले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणारची माहिती समोर आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times