हैदराबादच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुरुवात चांगली झाली नाही. कारण चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसन या सामन्यातही अपयशी ठरला, त्याला फक्त एकच धाव करता आली. त्यानंतर चेन्नईला अंबाती रायुडू, फॅफ ड्यू प्लेसिस आणि केदार जाधव असे तीन धक्के बसले. त्यानंतर चेन्नईची अवस्था ४ बाद ४२ अशी झाली होती. पण त्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांची चांगली भागीदारी रचल्याचे पाहायला मिळाले.
जडेजाने यावेळी अर्धशतकी खेळी साकारून सामन्यात चांगीच रंगत भरली. जडेजाने ३५ चेंडूंत ५० धावांची खेळी साकारली. धोनी अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून होता. धोनीने यावेळी ३६ चेंडूंत नाबाद ४७ धावांची खेळी साकारली. पण चेन्नईला या सामन्यात पराभव पत्करावा लागला.
हैदराबादच्या संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हैदराबादला यावेळी पहिल्याच षटकात धक्का बसला. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहारने यावेळी पहिल्याच षटकात हैदराबादच्या जॉनी बेअरस्टोला बाद केले. जॉनी बाद झाल्यावर काही वेळ कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांची जोडी जमली. पण चेन्नईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने मनीषला बाद केले आणि हैदराबादला दुसरा धक्का बसला. पांडे बाद झाल्यावर वॉर्नर आणि केन विल्यम्सन ही अनुभवी जोडी मैदानात होती.पण या जोडीला मोठी भागीदारी उभारता आली नाही. पीयुष चावलाला मोठा फटका मारण्याच्या नादात वॉर्नर आऊट झाला, त्याला २८ धावा करता आल्या. वॉर्नर बाद झाल्यावर संघाची सर्व जबाबदारी केनवर आली होती. पण वॉर्नर बाद झाल्यावर दुसऱ्याच चेंडूवर केनही आऊट झाला. केनने यावेळी धावचीत होत आत्मघात केला. हे दोघेही बाद झाल्यावर हैदराबाद मोठी धावसंख्या उभारणार नाही, असे वाटत होते. पण यावेळी हैदराबादच्या युवा खेळाडूंनी संघाला आधार दिला.
प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा या युवा फलंदाजांनी यावेळी हैदराबादचा सावरले. त्याचबरोबर हैदराबादला वॉर्नर आणि केन बाद झाल्यावर सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. प्रियम गर्गने यावेळी २६ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटाकारच्या जोरावर नाबाद ५१ धावांची खेळी साकारली त्यामुळेच हैदराबादला चेन्नईपुढे १६५ धावांचे आव्हान ठेवता आले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times