म. टा. प्रतिनिधी, पुणेः ‘जिल्ह्यातील काही कंपन्यांमध्ये कामगारांना करोनाचा प्रार्दुभाव होत असताना, कंपनीचे कामकाज बंद राहण्याच्या शक्यतेने काही कंपन्या माहिती लपवून ठेवत आहेत. कंपन्यांनी माहिती लपवून न ठेवता प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. अन्यता संबंधित कंपन्यांवर कारवाई केली जाईल’ अशी तंबी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. करोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी शहरांबरोबर ग्रामीण भागात ‘पोस्ट कोव्हिड ओपीडी’ सुरू करा आणि शहरांप्रमाणे ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी उपचाराचे दर निश्चित करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी विधान भवन येथे करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘कंपन्यांमधील कामगारांमुळे प्रार्दुभाव वाढू नये, यासाठी कंपन्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कंपनीचे कामकाज बंद ठेवले जाईल, या शक्यतेने करोनाबाधित कामगारांची माहिती लपवून ठेऊ नये’

करोनातून बरे झालेल्या रुग्णांचे समुपदेशन आणि आवश्यकता भासल्यास औषधोपचारासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसाठी ताबडतोब ‘पोस्ट कोव्हिड ओपीडी’ सुरू करण्याचे आदेश देऊन पवार म्हणाले, ‘करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, घरी गेल्यानंतर या रुग्णांना त्रास होत असल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसाठी पाच ठिकाणी ‘पोस्ट कोव्हिड ओपीडी’ सुरू करण्यात येणार आहेत. पुण्यातील दोन्ही जम्बो रुग्णालये, ससून रुग्णालय, बाणेर येथील कोव्हिड रुग्णालय व नायडू रुग्णालय या ठिकाणी प्रशासनाने लवकरात लवकर ओपीडी सुरू करण्याची कार्यवाही करावी. शहरांप्रमाणे ग्रामीण भागासाठीही या ओपीडी सुरू करण्यात याव्या. तसेच शहरांप्रमाणे ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी उपचाराचे दर निश्चित करण्यात यावे’

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांवर वेळेत उपचार होऊन संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. मात्र, शहरात काही नागरिक अद्यापही मास्क न घालता रस्त्यांवर फिरताना आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शिस्त पाळणे गरजेचे आहे’ असे त्यांनी सांगितले.

‘शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, आरटीपीसीआरसह अन्य चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे’ अशी सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली. बैठकीला महापौर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण, आमदार अशोक पवार, राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, अण्णा बनसोडे आणि सुनील कांबळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस. चोक्कलिंगम, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. डी. बी.कदम आदी उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here