म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः समाजाच्या हितापेक्षा स्वार्थासाठी धनगर समाजातील नेते वेगवेगळी आंदोलने करत असल्याने मूळ प्रश्नाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत. यामुळे यापुढे धनगर समाजातील सर्व संघटना एका झेंड्याखाली येऊन आरक्षणाच्या मागणीची हक्काची लढाई लढतील असा महत्त्वपूर्ण ठराव कोल्हापुरात झालेल्या गोलमेज परिषदेत संमत करण्यात आला.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाजाचे आंदोलन सुरू आहे. पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने गोलमेज परिषद घेण्यात आली. ज्येष्ठ नेते आण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत समाजातील अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या.

डांगे म्हणाले, आरक्षणाच्या लढाईसाठी एकत्र आला आहे. पण धनगर समाज अजूनही एकत्र येत नसल्याचे दिसते. ही लढाई एकाने नव्हे तर एकीने लढण्याची वेळ आली आहे. यामुळे समाजातील नेत्यांनी स्वार्थ बाजूला ठेवून एका झेंड्याखाली एकत्र येण्याची गरज आहे.

माजी मंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, आरक्षण हा धनगर समाजाचा हक्क आहे. हा हक्क मिळवण्यासाठी एकीची वज्रमुठ बांधण्याची आवश्यकता आहे. जो समाजापेक्षा आपली पोळी भाजून घेण्यासाठी पुढे पुढे करेल, त्याला समाजानेच दबाव आणत रोखायला हवे. समाजातील विविध नेत्यांनी पुढील आंदोलनाबाबत या परिषदेत अनेक सूचना मांडल्या. त्यानंतर परिषदेत पाच ठराव केले. यामध्ये सर्व संघटनांनी एका झेंड्याखाली येत यापुढे आंदोलन करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात आला. गोलमेज परिषदेची व्याप्ती वाढवण्यासाठी समाजातील आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, नेत्यांची पुन्हा व्यापक बैठक घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली आरक्षणाची सुनावणी रोज घेत तातडीने निर्णय व्हावा यासाठी पाठपुरावा करण्याचेही यावेळी ठरले. मेंढपाळ बांधवांना रोज नव्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. अलिकडे शेळ्या व मेंढ्या चोरणाऱ्या टोळ्या वाढल्या आहेत. त्यांना आळा बसावा व विविध उपक्रम व योजनेच्या माध्यमातून मेंढीपालन व्यवसाय विकासाचा मार्ग तयार करावा असा ठरावही यावेळी संमत करण्यात आला.

धनगर आरक्षणाला मराठा सामाजाचा पाठिंबाः संभाजीराजे

धनगर समाजाने सुरू केलेल्या आरक्षणाच्या लढाईत मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा राहिल अशी ग्वाही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी धनगर समाजाचे नेते हे माजी मंत्री राम शिंदे यांना दिली.

धनगर समाजाची गोलमेज परिषद झाल्यानंतर शिंदे यांनी सायंकाळी खासदार संभाजीराजे यांची भेट घेऊन धनगर आरक्षणाच्या लढाईला सहकार्य करण्याची विनंती केली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत धनगर समाजाने पाठिंबा द्यावा, मराठा समाज धनगर आरक्षणाच्या लढाईत ताकतीने उतरेल अशी ग्वाही संभाजीराजे यांनी दिली. दोन्ही समाजांनी मिळून आपापल्या आरक्षणाच्या लढाईसाठी लढा देण्याचा निर्धारही या वेळी व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, सकाळी आमदार गोपीचंद पडळकर यांनीही खासदार संभाजीराजे यांच्याकडे धनगर समाजाला पाठिंबा देण्याची मागणी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here