वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोविड पॉझिटिव्ह आल्याचा परिणाम अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीवर कशाप्रकारे होईल, याविषयी अनेक चर्चा रंगल्या असतानाच शुक्रवारी अमेरिकेतील स्टॉक फ्युचर्स आणि आशियाई शेअर बाजार पडले.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या करोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून एस अॅण्ड पी ५०० आणि दाऊ इंडस्ट्रियल्स यांचे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स १.९ टक्क्यांनी घसरले. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात तेलाचे दरही खाली आले आहेत.

व्हाइट हाऊसने वरिष्ठ सदस्य होप हिक्स यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केल्यानंतर काही तासांतच डोनाल्ड ट्रम्प व त्यांची पत्नी करोना पॉझिटिव्ह झाल्याचे ट्रम्प यांनी स्वतःच ट्विट करून जगाला कळवले. होप हिक्स हे ट्रम्प यांच्याबरोबर या आठवड्यात अनेकवेळा एकत्र प्रवास करत होते. अशा प्रकारे दोघे दिग्गज नेते करोना पॉझिटिव्ह आल्यामुळे राजकारणावरही याचे परिणाम होतील, अशी भीती रॅबोबँकने व्यक्त केली आहे.

जागतिक बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ३७.४० डॉलर प्रती बॅरल इतके खाली आले आहेत. त्यात ३.४१ टक्क्यांची घसरण झाली. ट्रम्प आणि त्यांची पत्नी यांना करोनाची लागण झाल्यानंतर जगभरातील कमॉडिटी बाजारांवर परिणाम झाला. त्यातच अमेरिकन अर्थव्यवस्था करोनाच्या गर्तेत सापडली आहे. तेथील केंद्रीय बँकेने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी तेथील केंद्रीय बॅंकेकडून पॅकेज घोषीत केले जाण्याची शक्यता आहे. करोना साथीच्या विस्तारत जाणाऱ्या परिणामामुळे क्रूडच्या मागणीत सातत्याने घट होत आहे.

या सगळ्या घटनांचा परिणाम म्हणून आशियाई भांडवल बाजार दोलायमान झाले. वरील बातमीमुळे शुक्रवारी शांघाय व हाँगकाँग येथील भांडवल बाजारातील सौदे बंद पडले. निक्केई-२२५ निर्देशांकाने ०.८ टक्क्यांची घसरण नोंदवली आणि तो २२,९९९.७५ अंकांवर बंद झाला. टोक्यो शेअर बाजाराचे व्यवहार गुरुवारच्या तांत्रिक समस्येनंतर सुरू झालेले दिसले. जपानी शेअर बाजार तेथील सरकारने घोषित केलेल्या विशेष अर्थसाह्यामुळे सावरत असतानाच ट्रम्प करोना पॉझिटिव्ह झाल्याची बातमी येऊन थडकली आणि हा शेअर बाजार पडला. ऑस्ट्रेलियाचा एस अॅण्ड पी/ए एस एक्स २०० निर्देशांक १ टक्का घसरून ५,८१५.९० वर बंद झाला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here