नवी दिल्ली: नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री यांच्याविरोधात भाजप कोणता उमेदवार देणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असतानाच केवळ ९ रुपये कॅश जमा असलेल्या एका उमेदवाराने केजरीवाल यांना ललकारले आहे. श्री व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक असं या उमेदवाराचं नाव असून यावेळी त्यांनी केजरीवाल यांच्याविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. स्वामींनी आतापर्यंत कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह १६ निवडणुका लढल्या आहेत.

सर्वांनी आपल्याला स्वामी या नावानंच संबोधावं असा आग्रह धरणाऱ्या या स्वामींनी भाजप, राष्ट्रवादी आणि हिंदुस्थान जनता पार्टी या तीन वेगवेगळ्या पक्षाच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी जमानत म्हणून दहा हजार रुपयाचं डिपॉझिटही भरलं आहे. तुम्ही भाजपचे अधिकृत उमेदवार आहात का? असा सवाल त्यांना केला असता भाजपची त्यांच्यावर नजर असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भगवा पक्ष समाजात चांगलं काम करणाऱ्यांवर लक्ष ठेवून असतो. त्यामुळे मी केलेली सामाजिक कामं पाहून भाजपकडून मला अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी आशा आहे, असं त्यांनी म्हटलंय. भाजपने मला तिकीट दिले नाही तर इतर पक्ष तरी मला तिकीट देतील, असं सांगतानाच मला दिल्लीसाठी काम करायचं आहे. निस्वार्थीपणे मला दिल्लीकरांची सेवा करायची आहे, असं स्वामी म्हणाले.

स्वामी सध्या द्वारका येथे त्यांच्या एका मित्रासोबत राहतात. दिल्लीत राह्यला माझ्याकडे घर नाही. त्यामुळे मित्रासोबत राहावं लागत आहे, असं ते म्हणाले. त्यांचा हा मित्रं एका बांधकामाच्या साइटवर मजदूर म्हणून काम करतो. स्वामींकडे केवळ ९ रुपये रोख रक्कम आहे. तशी माहिती त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. त्यांनी शरद पवार (राष्ट्रवादीचे नेते नव्हे) नावाच्या एका व्यक्तीकडून ९९,९९९ रुपये उधार घेतले असून त्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे केजरीवाल विरुद्ध स्वामी असा सामना दिल्लीच्या निवडणूक मैदानात रंगतोय का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here