म. टा. प्रतिनिधी, : शेतीच्या वादावरून एका वृद्धाने मुलगा व नातवाच्या मदतीने पहिल्या पत्नीचा न्यायालयाजवळ खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. केसरबाई कारभारी गवळी (वय ७५, रा. भिंगी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी नातू किसन मुरलीधर तांबे याने दिलेल्या फर्यादीवरून महिलेचा पती कारभारी किसन गवळी (वय ८०), सावत्र मुलगा भरत कारभारी गवळी, नातू अतुल भरत गवळी (सर्व रा. घायगाव) व अन्य अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी कारभारी किसन गवळी याची घायगाव शिवारात शेतजमीन आहे. पहिली पत्नी केसरबाईपासून एक मुलगी झाल्यानंतर दीड वर्षात केसरबाई माहेरी भिंगी येथे निघून गेल्या. जवळपास चाळीस वर्षांपासून त्या भिंगी येथे राहत होत्या. कारभारीने केसरबाई यांना सोडून बिजलाबाई यांच्याशी दुसरा विवाह केला. केसरबाई यांचा पती कारभारी गवळी व सवत बिजलाबाई कारभारी गवळीसोबत जमिनीचा वाद होता. त्यामुळे जमीन व पोटगी मिळवण्यासाठी वैजापूर न्यायालयात १९७२ पासून दावा दाखल केला आहे. कारभारी गवळी याने पोटगीपोटी केसराबाई यांना चार एकर ३३ गुंठे जमीन दिली. मात्र, बिजलाबाई यांचा मुलगा भरत कारभारी गवळी व नातू अतुल भरत गवळी हे जमिनीचा ताबा देत नसल्यामुळे जमिनीचा ताबा मिळावा म्हणून वैजापूर येथील न्यायालयात दावा सुरू होता. दिवाणी न्यायालयात याप्रकरणी तारीख असल्याने किसन तांबे हे आजी केसरबाई गवळी यांना सोबत घेऊन दुचाकीवर न्यायालयात आले होते. न्यायालयाजवळ उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर हे दोघे बसले होते. सकाळी अकराच्या सुमारास अचानक कारभारी गवळी, अतुल गवळी, भरत गवळी व त्यांच्यासोबत ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी व्यक्ती असे चौघे जण तिथे आले. त्यातील अतुल गवळी व अनोळखी व्यक्तीने किसन यांना धरले व सावत्र मुलगा भरत याने केसरबाई यांना धरले. कारभारी याने सोबत आणलेल्या चाकुने केसरबाई यांच्या डोक्यात, पाठीवर व छातीवर सपासप वार केले. त्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या. न्यायालयाजवळ भर गर्दीत ही घटना घडल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कन्नड येथील उपविभागिय पोलिस अधिकारी जगदीश सातव, वैजापुरचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक रमेश जाधवर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी कारभारी गवळी यास ताब्यात घेतले, पण घटनेच्या वेळी आरडाओरड झाल्याने गर्दी पाहून अतुल गवळी, भरत गवळी व अन्य एक जण पसार झाले.

५० वर्षांचा वाद

मागील पन्नास वर्षांपासून वैजापूर येथील न्यायालयात जमीनीचा वाद सुरू आहे. कारभारी गवळी याची म्हस्की रस्त्यावर अठरा एकर जमीन असून पहिली पत्नी केसरबाई हिच्याशी जमत नसल्याने त्याने बिजलाबाईशी दुसरे लग्न केले. त्याने पोटगीपोटी केसरबाई यांना चार एकर ३३ गुंठे जमीनही दिली, पण सावत्र मुलगा भरत व नातू अतुल हे दोघे जमिनीचा ताबा देण्यास तयार नव्हते. त्यामुळे जमिनीचा ताबा घेण्याबाबत न्यायालयात वाद सुरू होता. या प्रकरणातील सर्वांना न्यायालयाने समन्स बजावून हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुळे किसन तांबे हे आपली आजी केसरबाई गवळी यांना दुचाकीवर घेऊन न्यायालयात आले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here