नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणी ५ पोलिसांना निलंबित केल्यानंतर ( hathras case ) आता जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी होतेय. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनंतर पीडितेच्या भावानेही हीच मागणी केली आहे. हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करावं. यासह सुप्रीम कोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चाकशी करावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी व्हावी. हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी निलंबित करावं अशी आमची मागणी आहे, असं कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी पीडितेचा भाऊ म्हणाला. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि पक्षाच्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी वाड्रा यांनी हाथरस प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करावं आणि त्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. सर्वात वाईट वागणूक जिल्हाधिकाऱ्यांती होती, असं हाथरसच्या पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे. मग जिल्हाधिकाऱ्यांना कोण पाठिशी घालतंय? त्यांना त्वरित निलंबित करून या संपूर्ण प्रकरणात त्यांच्या भूमिकेची चौकशी करावी, असं ट्विट प्रियांका गांधी यांनी केलं आहे.

पीडित कुटुंब न्यायालयीन चौकशीची मागणी करत आहे. मग एसआयटीकडून चौकशी सुरू असताना सीबीआय चौकशीचं चर्चा का होतेय. युपी सरकारची झोप उडाली असेल तर त्यांनी पीडित कुटुंबीयं ऐकलं पाहिजे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

हाथरस येथील दलित मुलीवरील कथित सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी युपी सरकारने शुक्रवारी पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षकांसह पाच पोलिसांना निलंबित केलं.

दरम्यान, जिल्हा दंडाधिकारी प्रवीण लक्षकार यांचा कथित व्हिडिओ समोर आला आहे. यात ते पीडित कुटुंबाला धमकावताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here