खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये २२ वर्षीय तरुणी कामाच्या शोधात नेपाळहून दिल्लीला आली. तेथून ती नोएडाला गेली. येथे एका इव्हेंट कंपनीत कामाला लागली. याचदरम्यान तिची अन्य एका नेपाळी तरुणीसोबत मैत्री झाली. २०१९ मध्ये पीडित तरुणी मैत्रिणीसह सूरत येथे गेली. येथे पीडित तरुणी एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करु लागली. दरम्यान तिची सुफीसोबत ओळख झाली.
सुफीही मूळ नेपाळची असल्याने दोघींची मैत्री झाली. माझा मानलेला भाऊ प्रवीण हा दुबईत सॉफ्टवेअर इंजीनिअर असल्याचे तिने सांगितले. पीडित तरुणीसोबत त्याचे व्हीडिओ कॉलद्वारे बोलणेही करुन दिले. प्रवीण याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. दरम्यान जानेवारी २०२० मध्ये सुफी ही पीडित तरुणीला घेऊन लखनौ येथे आली. तरुणीने विश्वासाने सुफीकडे दीड लाख रुपये व दोन मोबाइल दिले. लखनौमध्ये आल्यानंतर दोन महिन्यांनी लॉकडाउन सुरू झाले. तरुणीला पैशाची गरज भासू लागली. तरुणीने सुफीला पैसे परत मागितले. सुफीने पैसे देण्यास नकार दिला. पीडित तरुणीचा छळ सुरू केला. पीडित तरुणीने कशीबशी ही माहिती प्रवीण याच्यापर्यंत पोहोचविली. प्रवीण याने तिला लखनौमधील एका हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले. तरुणी हॉटेलमध्ये गेली. तेथे राहायला लागली.
दरम्यान दोन दिवसांनी प्रवीण लखनौ येथे आला. हॉटेलात त्याने तरुणीवर अत्याचार केला. मोबाइलद्वारे अत्याचाराचे चित्रीकरणही केले. याद्वारे प्रवीण हा तरुणीला ब्लॅकमेल करू लागला. पोलिस माझे काहीच बिघडवू शकत नाहीत, तुला तक्रार करायची तर खुशाल कर,असे प्रवीण तिला म्हणाला. दरम्यान लखनौमधील एका पोलिसाला पीडित तरुणीने आपबिती सांगितले. प्रवीणचे नाव घेताच पोलिसांने तिला प्रकरण सामंजस्याने मिटविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तरुणीला धमक्या यायला सुरुवात झाली. तरुणीने कोराडीत राहणाऱ्या मैत्रिणीला आपबिती सांगितली. मैत्रिणीने तिला ओला करुन नागपुरात बोलाविले. दोन दिवस तिला धीर दिला. त्यानंतर तिने कोराडी पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वजीर शेख यांनी प्रवीण व सुफीविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. प्रकरण लखनौमधील चिनहट पोलिस स्टेशनअंतर्गत असल्याने शेख यांनी दाखल गुन्ह्यांच्या दस्तऐवजासह तरुणीला पोलिस संरक्षणात लखनौकडे रवाना केले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times