सांगली बाजार समितीमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर याचे उट्टे काढण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होते. राज्यातील सत्तेत आल्यानंतर त्यांनी ही वेळ साधली. बाजार समितीवर प्रशासकांची नेमणूक करून त्यांनी आपली महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली. प्रशासक नेमणुकी नंतरच अनेक संचालकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. याला अखेर रविवारी मूर्त रूप मिळाले. सांगली-मिरज रोडवरील वसंत कॉलनीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत संचालकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सभापती पाटील यांच्यासह उपसभापती तानाजी पाटील, माजी उपसभापती जीवन पाटील, स्वाभिमानीचे कुमार पाटील, हमाल नेते बाळासाहेब बंडगर, दीपक शिंदे, वसंतराव गायकवाड, जयश्री भीमराव पाटील, अजित बनसोडे, यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
सभापती दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार संजय पाटील यांचा प्रचार करीत भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपासह खासदार संजय पाटील यांनाही धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेले काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही मंत्री जयंत पाटील यांनी धक्का दिला. स्वाभिमानी आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रत्येकी एक संचालक राष्ट्रवादीत दाखल झाले. काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनानंतर जिल्ह्यात कमकुवत झालेला मिरज तालुक्यातील काँग्रेसचा गट राष्ट्रवादीत दाखल झाला. यामुळे काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांच्या गटाला खिंडार पडले. जयंत पाटील यांनी बाजार समितीच्या राजकारणातून इतर पक्षांना धक्का दिल्याने त्यांचे मनसुबे स्पष्ट झाले आहेत. दरम्यान, मुदत संपलेल्या संचालक मंडळाला प्रशासक नियुक्तीनंतर पुन्हा मुदतवाढ मिळाली होती. संचालकांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने आता पुन्हा प्रशासक नियुक्तीची शक्यता जवळपास संपल्याने संचालक मंडळाला अभय मिळाल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times