मुंबई : केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘मेक इन इंडिया’ला अॅमेझॉन या जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीचे पाठबळ मिळणार आहे. अॅमेझॉनने भारतीय उत्पादकांना जागतिक बाजारपेठेची द्वारे खुली केली आहे. पुढील पाच वर्षात १० अब्ज डॉलरची भारतीय वस्तूंची निर्यात करण्याची ग्वाही खुद्द अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांनी दिली. बेझॉस भारताच्या दौऱ्यावर आले असून दिल्लीत त्यांनी लघु उद्योजकांच्या परिषदेला बुधवारी संबोधित केले.

भारतात ई-कॉमर्सची बाजारपेठ झपाट्याने वाढली आहे. यातील वृद्धी आणि व्यावसायिक संधी लक्षात घेत अॅमेझॉन भारत एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक लघु आणि मध्यम उद्योजकांना डिजिटल उपकरणांनी सुसज्ज करण्यासाठी वापरली जाणार असल्याचे बेझॉस यांनी सांगितले. २०२५ पर्यंत ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातील १० अब्ज डॉलरच्या वस्तूंची अॅमेझॉन निर्यात करेल, असे बेझॉस यांनी सांगितले. उद्योजकांना मार्गदर्शन करताना बेझॉस यांनी आपल्या उमेदीच्या काळातील संघर्ष कथन केला. सुरुवातीच्या काळात ग्राहकांना वस्तू घरपोच करण्यापासून वस्तूंची पॅकिंग करणे अशी आपण कामे केली असे, बेझॉस यांनी सांगितले.

बेझॉस यांचे मंगळवारी दिल्लीत आगमन झाले. त्यांनी राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. संध्याकाळी सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या दौऱ्यात अॅमेझॉनकडून भारतात विस्ताराबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

बेझॉस यांनी लुटला पतंगबाजीचा आनंद मकरसंक्रातीनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या जेफ बेझॉस यांनी बुधवारी नवी दिल्लीत बच्चे कंपनीसोबत पतंगबाजीचा मनमुराद आनंद लुटला. बेझॉस यांनी कुर्ता परिधान केला होता. पतंग उडवतानाचा व्हिडीओ बेझॉस यांनी इंन्टाग्रामवर शेअर केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here