म.टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील करोना संसर्गाचा वेग काही प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. नव्याने समोर येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने जास्त असल्याचे दिलासादायक चित्र आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील करोनाचा रिकव्हरी रेट हा ८६.७६ इतका आहे. दुसरीकडे, करोनाचा मृत्यूदरही २.४४ टक्के इतका खाली आला आहे. जिल्ह्यातील मृत्यूदराचा हाच आकडा एप्रिल ते जून महिन्यापर्यंत तब्बल १२ ते १४ टक्के इतका होता.

जिल्ह्यात मे महिन्यात तर करोनाने जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये हातपाय पसरले. जुलै ते ऑगस्ट महिन्यात जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली. जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित रुग्ण समोर येऊ लागले. या काळात चिंतेची बाब म्हणजे, करोनाचा मृत्युदर देखील वाढताच होता. हजारोंच्या संख्येने करोनाबाधित रुग्ण असताना आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत होता. मात्र, अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेत फेरबदल करण्यात आले. आवश्यक ती यंत्रसामग्री तसेच सोयीसुविधा उपलब्ध झाल्याने करोनाच्या लढ्यात आरोग्य यंत्रणेला यश येऊ लागले. सद्यस्थितीत करोनाचा संसर्ग काही प्रमाणात ओसरला असून, दररोज नव्याने समोर येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट ८५ टक्क्यांहून जास्त आहे. मृत्यूदरही घटला असून, तो आता २.४४ टक्क्यांवर आला आहे. सध्या ५ हजार २७२ ऍक्टिव्ह रुग्ण-जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ हजार ८०६ इतकी आहे. त्यातील ४२३४३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्हा कोविड रुग्णालयासह इतर कोविड सेंटर, खासगी रुग्णालये मिळून ५ हजार २७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४ हजार १४६ रुग्ण कोणतीही लक्षणे नसलेले तर 1 हजार १२६ रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. त्यातही २०२ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार १९१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here