मार्केटयार्ड परिसरात साई स्पंदन कोविड सेंटर आहे. हे सेंटर बंद पडावे, या उद्देशाने आरोपी विजय आसाराम रासकर, दीपक लक्ष्मण पवार, ऋषिकेश रासकर, आकाश रासकर, विनायक कुलकर्णी, कृष्णा दळवी यांनी शनिवारी रात्री या सेंटरमध्ये प्रवेश केला. तसेच या सेंटरच्या पुढील बाजूला लावलेल्या नेटला आग लावली. या आगीमध्ये सेंटरमध्ये उपचार घेत असलेले कोविड रुग्ण व तेथील कर्मचारी यांच्या जीविताला धोका पोहोचण्याची शक्यता आहे, हे माहिती असताना देखील जाणीवपूर्वक ही आग इमारतीमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिवाच्या भीतीने येथील लोक सैरावैरा पळू लागले.
आरोपींनी सेंटरमधील पार्किंग केलेली वाहने ढकलून देत त्यांचे नुकसान केले. कोविड सेंटरमध्ये असणाऱ्या डॉक्टरांना देखील आरोपींनी धक्काबुक्की केली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कोतवाली पोलीस दाखल झाले. अखेर या प्रकरणी कोविड सेंटर चालविणारे डॉ. रोहित रमेश आहेर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून विजय रासकर, दीपक पवार, ऋषिकेश रासकर, आकाश रासकर, विनायक कुलकर्णी, कृष्णा दळवी यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times