डॉ.तांबे हे आज काँग्रेसच्या एका कार्यक्रमासाठी नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी हाथरस येथे झालेल्या घटनेचा निषेध करीत उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘हाथरस प्रकरणाबाबत उत्तर प्रदेश सरकारची जी भूमिका आहे, ती लोकांना संशयास्पद वाटत आहे. पीडित मुलीवर बलात्कार झाला नाही, असे काही जण वक्तव्य करून संशय निर्माण करतात. पण त्या मुलीने मृत्यूपूर्वी जबाब दिला आहे. कायद्याने हा जबाब गृहीत धरला जातो. कारण शेवटी मृत्यूसमयी मनुष्य खोटा बोलत नाही, हे कायद्याने गृहीत धरले आहे,’
असे सांगतानाच तांबे पुढे म्हणाले, ‘हाथरसची घटना ही क्रुर व अमानवी आहे. या घटनेबद्दल भाजपचे कार्यकर्ते शंका उपस्थिती करतात, हे अतिशय क्लेशदायक आहे. या घटनेत सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडावी. देशाचे पंतप्रधान यांच्याकडून देखील अद्याप या प्रकरणाबाबत देशातील जनतेला आश्वस्त करणारे वक्तव्य आले नाही. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा ते करीत नाहीत. त्यामुळे हा प्रकार कुठेतरी दाबून टाकण्याचा प्रयत्न होतोय की काय, अशी शंका उपस्थित होत आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
हा तर निर्लज्जपणाचा कळस
उत्तर प्रदेशातील बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी उत्तर प्रदेशातील वाढत्या बलात्कार प्रकरणावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘मुलींवर संस्कार नसल्यानं बलात्काराच्या घटनांत वाढ झाल्याचं’ सांगत सुरेंद्र सिंह यांनी मुक्ताफळं उधळलीत. सिंह यांच्या वक्तव्याचा आमदार डॉ.तांबे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘केवळ हाथरस प्रकरणच नाही तर उनावची घटना असेल किंवा इतर घटना असतील, त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेजबाबदारपणाची वक्तव्ये केली. काही घटनात तर आरोपीच्या बाजुने निदर्शने केली. अशा प्रकरणांमध्ये बेताल वक्तव्ये ही पक्षाची जबाबदार लोक करतात, तर हा निर्लज्जपणाचा कळस आहे.’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times