सुंतीलाल उर्फ शांताराम बाबुलाल पावरा (वय ३८) याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो १ एप्रिल २०१९ पासून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा कारागृहात आहे. त्याच्याकडे कारागृहाच्या कार्यालयीन नियमावलीनुसार स्वयंपाकगृहाची जबाबदारी देण्यात आली आहे. कारागृहातील कैद्यांसाठी जेवण बनवण्याचे काम तो करतो. रविवारी सुंतीलाल पावरा कारागृहातील नियमावलीनुसार त्याचा मेव्हणा राजू सखाराम पावरा यांच्याशी फोनवर बोलला. मेहुण्याशी तो फोनवर तीन मिनिटे बोलत होता. सकाळी साडेदहा वाजता त्याला अचानक उलट्या व चक्कर यायला सुरूवात झाली. त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने कारागृहातील इतर कैद्यांच्या मदतीने त्याला कारागृह रक्षकाने कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्राथमिक उपचारासाठी आणले. त्या ठिकाणी त्याला काय होतेय म्हणून विचारणा केली असता, त्याने स्वयंपाक घरातील साफसफाईसाठी आणलेले फिनाइल प्यायल्याची माहिती दिली. त्यामुळे त्याला कारागृह रक्षक विक्रम हिवरकर, दत्ता खोत, अमित पाडवी, सीताराम हिवारे यांच्यासह डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
त्यानंतर कैदी सुंतीलाल पावरा याने त्याच्या मेहुण्याला लावलेल्या फोनवरील ऑडिओ रेकॉर्डिंग तपासली असता, ती पावरी भाषेत होती. त्याच्या मेहुण्याकडून कैदी सुंतीलाल याने घरचा नंबर मागितला होता. तेव्हा मेहुण्याने माझ्याकडे तुझ्या घरचा नंबर नसल्याचे सांगितले. म्हणून सुंतीलाल पावरा याने ‘मी मरून जाऊ का, वकील करा, माझा लवकर जामीन करा,’ असे सांगितले. त्यावर मेहुणा राजू पावरा याने सांगितले की, लॉकडाऊन असल्याने मालक पैसे देत नाही, त्यामुळे पैसे नसल्याने वकील कुठून करायचा. पत्नीच्या अंगावरील दागिने विकून वकील करा, पण जामीन करा, अशी त्याने विनंती केली. जामीन होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कारागृह प्रशासनाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर सोमवारी कारागृह रक्षक विक्रम मोतीराम हिवरकर यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून सुंतीलाल पावरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times