एम्सच्या अहवालानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा रंगलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून सरकार व मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांचे कान टोचले होते. तसंच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर आम्ही निशब्द आहोत. एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाचे प्रमुख असलेल्या डॉ. सुधीर गुप्ता यांचा हा अहवाल आहे. त्यांचे शिवसेना व अन्य कोणत्या राजकीय पक्षाशी कोणतेही संबंध नाहीत, असं स्पष्ट केलं आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
‘‘
‘सुशांतसिंह राजपूत प्रकरणी एम्सच्या अहवालानंतर शिवसेना उड्या मारायला लागली आहे. त्यांना वाटतं की केसला निकाल लागला. मृतदेह नसल्यानं फक्त उरल्यासुरल्या गोष्टींवर अहवाल द्यावा लागला आहे. सीबीआयचा अहवाल अजून बाकी आहे. अजून खूप काही बाकी आहे. एवढ्या लवकर डीजे वाजवू नका,’ अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली आहे.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर एम्सच्या अहवालाचा सर्वांनाच प्रतीक्षा होती. हा अहवाल आल्यानंतर त्यातून महत्त्वाच्या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. एम्समधील डॉ. सुधीर गुप्ता यांच्या पथकाने याप्रकरणी अहवाल दिला असून त्यात ही आत्महत्याच असल्याचे नमूद केले आहे. त्याचवेळी सुशांतची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची शक्यता त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times