वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पुण्याच्या दक्षिण भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्या प्रकरणी या लोकप्रतिनिधींनी आंदोलनाची भूमिका घेत कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. कार्यकारी अभियंता अशित जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्वारगेट पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे त्याशिवाय सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमांखाली या लोकप्रतिनिधींवर कारवाई केली आहे.
जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार टिळेकर यांनी फोन द्वारे संपर्क साधला होता. आपण आणि आपल्या पक्षाचे नगरसेवक हे सोमवारी दुपारी पाणी प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार टिळेकर वीरसेन जगताप नगरसेविका कामठे रंजना भोसले चेतन तळेकर व इतर ३५ कार्यकर्ते यांनी बेकायदा जमाव जमवून माझ्या कार्यालयात आले होते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये म्हणून आपण चार ते पाच जण चर्चा करून असे सांगत असताना टिळेकर यांनी आमच्या प्रभागामध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत नाही असा आरडाओरडा करत टेबलवरील फाइल्स मात्र फेकून दिल्या. खिडक्यांची कपाटाची काच फोडण्यात आली. माझ्या अंगावर जबरदस्तीने येऊन मला खुर्चीतून बाहेर काढण्यात आले. अशाप्रकारे सरकारी कामात अडथळा आणला. माझ्या इच्छेविरुद्ध माझ्या कपाळाला गंध लावण्यात आला मला हार घालून माझी आरती करण्यात आली. या दरम्यान माझ्या विरोधात घोषणाबाजी तसेच शिवीगाळ करण्यात आली, असे जाधव यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
काय आहे हे प्रकरण
कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. यासाठी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार योगेश टिळेकर आणि या प्रभागातील भाजपचे नगरसेवक हे आपल्या कार्यकर्त्यांसह जाधव यांच्या कार्यालयात आंदोलनासाठी गेले होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times